नागपूरात एक व्यक्ती करोनाग्रस्त असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्याच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. या व्यक्तीचा एक मुलगा महाविद्यालयात शिकत असून त्यालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही व्यक्ती आठवड्याभरापूर्वी अमेरिकेतून नागपूरमध्ये परतली आहे. दरम्यान, चाचणीनंतर या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर संबंधित व्यक्तीची करोना चाचणी करण्यात आली या चाचणीचा अहवाल बुधवारी समोर आला, त्यात याची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, या व्यक्तीची मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत गेल्यानंतर शाळा प्रशासनाने तिला खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेश नाकारला.
मात्र, या प्रकारामुळे इतर पालक शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. करोनाबाधितांची नावं उघड न करण्याचं आवाहन सरकारनं केल्यानं शाळा प्रशासनाने सुरुवातीला पालकांना याबाबत माहिती दिली नाही. मात्र, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने शाळेला नाईलाजाने विद्यार्थीनीला प्रवेश नाकारण्यामागणे कारण स्पष्ट करावे लागले.
दरम्यान, या करोनाबाधित व्यक्तीचा मुलगाही नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला. मात्र, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून कॉलेज प्रशासनाने त्याला प्रवेश नाकारला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2020 12:57 pm