मुंबई व कोकण किनारपट्टीवर देवमासा व डॉल्फिन हे महाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मालवणच्या किनाऱ्यावर शुक्रवारी रात्री अजस्त्र देवमासा मृतावस्थेत वाहून आला. हा मासा तब्बल ३० फूटांहून अधिक लांब होता. स्थानिक माच्छिमारांना रात्रीच्या सुमारास देवमाशाचा मृतदेह किनारी भागात तरंगताना दिसला. त्यानंतर तो वाहून किनाऱ्यावर आला.

मृतदेहामुळे किनारी परीसरात दुर्घंधी पसरली असून मृतदेहाची तातडीनं विल्हेवाट लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. देवमाशाचा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून तो वाहत किनाऱ्यावर आल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याला ७५० किलोमीटरची विस्तीर्ण सागरी किनारपट्टी लाभली आहे. सागरी जैवविविधतेचे अनोखे दर्शन या भागात पाहण्यास मिळते. पण सध्या जलप्रदूषण, भराव टाकणे, खारफुटींची कत्तल आदी कामे या भागात होत असल्याने सागरी परिसंस्थेचा समतोल बिघडत चालला आहे. याचा परिणाम गेल्या काही वर्षांत देवमासा, डॉल्फिन आदी सस्तन प्राण्यांवर होत असून ते मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर येत आहेत. तसेच त्यांना आलेल्या अवस्थेत पुन्हा समुद्रात ढकलण्यात येत असल्याचा प्रकारही वाढले आहेत त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे.

देवमासा वाहून येण्यामागची संभाव्य कारणे
– देवमाशाचे दिशादर्शन हे सोनार यंत्रणेप्रमाणे सुरू असते. यात काही बिघाड झाल्यास ते भरकटल्याने किनाऱ्यावर येण्याची शक्यता असते.
– सागरी परिसंस्थेत मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्याने या माशांवर परिणाम झाल्याची शक्यता.
– मोठ्या जहाजांचे पंखे लागून जखमी झालेले मासेदेखील अशा पद्धतीनं किनाऱ्यावर येऊ शकतात.

वजन हे मृत्यूमागचं कारण?
एका व्हेल माशाचे वजन हे काही टनात असते. तो जेव्हा किनाऱ्यावर वाहून येतो तेव्हा त्याचे वजन त्याला पेलता येत नाही. हे वजन पाण्यात पोहताना माशाला जाणवत नाही मात्र जमिनीवर जाणवते. त्यामुळे जमिनीवर आपल्याच वजनाखाली या माशांच्या शरीरातील सगळे अवयव दबले जाऊन अक्षरक्ष: फुटतात असं मत मांडलं जात आहे.