बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील महिंद्रवाडी शिवारात बुधवारी सकाळी एका विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. महिनाभरापूर्वी आष्टी, पाटोद्यासह अन्य तालुक्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तिघा जणांचा बळी घेतल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली होती. तोच बिबट्या करमाळा (जि.सोलापूर) परिसरात वनविभागाच्या मदतीने मारण्यात आला होता. आता पुन्हा महिंद्रवाडी येथील एका विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

महिंद्रवाडी शिवारातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याला बीड-कल्याण महामार्गावर काही वाटसरुंनी दोन दिवसापूर्वीच पाहिल्याची चर्चा होती. हा तोच बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा बिबट्या या भागात कसा पोहोचला आणि त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झाले नसुन वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.