विदर्भात उद्योगांना चालना देण्यासाठी खुल्या बाजारातून स्वस्तात वीजखरेदीची मुभा देण्याबरोबरच अन्यायग्रस्त विदर्भाचा आमूलाग्र कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणांचा व निर्णयांचा पाऊस पाडला.
अमरावती व बुलडाण्यातील १०२ सिंचन प्रकल्प पुढील सहा महिन्यात तर महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प अडीच ते चार वर्षांत पूर्ण करण्याच्या घोषणेसह अमरावतीला टेक्सटाईल पार्क आणि रात्रीही मोठी विमाने उतरु शकतील असा विमानतळ, संत्री प्रक्रिया उद्योग, गोंदिया व चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, नागपूरला आयआयटी व आयआयएम सुरु करण्यासाठी पावले टाकणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत निर्णयप्रक्रिया वेगाने होण्यासाठी दर आठवडय़ाला दोन दिवस म्हणजे नागपूर व अमरावती येथे मुख्यमंत्री फडणवीस जातीने तळ ठोकून आढावा घेणार आहेत.
विदर्भातील सिंचन, पाणी, रस्ते, वीज आदी पायाभूत क्षेत्रात वेगाने पावले टाकली जातील आणि विकासाला चालना दिली जाईल. उद्योगवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून विदर्भात कापूस मोठय़ा प्रमाणावर पिकत असल्याने अमरावतीला टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी नऊ उद्योजकांशी बोलणेही झाले असून त्यांनी जागा पाहून होकारही दिलेला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने जानेवारी २०१५ पर्यंत विदर्भातील राज्य महामार्ग खड्डेमुक्त केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
गोदावरी खोऱ्यात पूर्व विदर्भासाठी पाणी वापरून बरेच पाणी शिल्लक राहील, ते पूर्व विदर्भाकडे अगदी बुलडाण्यापर्यंत वळविले जाईल. त्यामुळे सुमारे ३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. विदर्भात उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. विदर्भाशेजारी आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये असल्याने आणि तेथे महाराष्ट्रापेक्षा स्वस्त वीज उपलब्ध असल्याने विदर्भात उद्योग सुरू करण्यास कोणीही उत्सुक नसतो. त्यामुळे त्यांना कोणाकडूनही थेट वीजखरेदी करता येईल, अशी मुभा दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य वीजनियामक आयोगाकडे अर्ज करण्यात येणार असून ओपन अ‍ॅक्सेससाठी आकारला जाणारा अधिभारही रद्द केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

विदर्भ विकासाच्या योजना

-विदर्भातील राज्य महामार्गावर जानेवारीपर्यंत खड्डामुक्ती. दोन वर्षांत १३२ मालगुजारी. तलावांमधील गाळ काढणार

-गोसीखुर्द प्रकल्पापुढील अडथळे दूर करुन कालबध्द कृती कार्यक्रम. अडीच ते चार वर्षांत गोसीखुर्द पूर्णत्वास आणि अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार

-केंद्रीय निधीतून सूक्ष्म सिंचनासह काही योजनांसाठी दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी देणार. सिंचनासाठी इस्त्रायली तंत्रज्ञान वापरणार.

-सुमारे ३० हजार क्विंटल बियाणे साठवण क्षमता असलेली आणि वातानुकूलित गोदामे उभारणार. संत्री प्रक्रिया उद्योग. धान कृषी विद्यापीठ उभारणार

*नागपूरपासून ५ किमी अंतरापुढे उद्योगांना परवानगी देणार. निर्यात सुविधा केंद्र एक वर्षांत उभारणार
*नागपूरमध्ये एक वर्षांत पीपीपी मॉडेलने टर्मिनल मार्केट एक वर्षांत सुरु  करणार. त्यासाठी १०० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण
*मेयो प्रकल्पापुढील अडथळे दूर करणार. मिहान प्रकल्पापुढील अडचणी दूर
*अमरावतीला रात्रीही मोठी विमाने उतरविता येतील, अशी धावपट्टी व सुविधा उभारणार
*गेले पाच वर्षे रखडलेल्या विदर्भातील छोटय़ा शहरांच्या सर्व विकास आराखडय़ांना एका दिवसात मान्यता दिली
*नागपूर सुधार प्रन्यासची क्षेत्रवाढ, नागपूर क्षेत्रविकास प्राधिकरण स्थापन करणार
*सेवाग्राम आराखडा आणि बुध्दिस्ट थीम पार्क उभारणार. – ताडोबा येथे स्थानिक रहिवाशांच्या रोजगारासाठी इको टूरिझम संकल्पना
*डॉ. आंबेडकरांच्या शांतीभवन येथील स्मृतींचे जतन करणार, निधीची तरतूद

विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक ते निर्णय तातडीने घेतले जातील.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री