शंभर रूपयांच्या बनावट नोटा देऊन भाजी विक्रेत्यांना गंडवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. पालघरमधील भाजी मंडईत ही कारवाई करण्यात आली असून, नकली नोटा चालवणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालघर शहरातील भाजी मंडईत संशयित व्यक्ती काही दिवसांपासून फिरायचा. रविवारी सायंकाळी साईबाबा मंदिर येथे लक्ष्मीबाई शिरसाठ या भाजीपाला विक्रेणाऱ्या महिलेकडून भाजीपाला विकत घेतला. त्यानंतर शंभर रूपयांची नोट दिली. नोट हातात घेतल्यानंतर लक्ष्मीबाई शिरसाठ यांना संशय आला. त्यांनी मुलगा गोरखनाथ याला शंभर रूपयांची नोट तपासायला दिली. ती नोट खोटी असल्याचं उघड झालं. त्यानंतर आजूबाजू्च्या भाजपाला विक्रेत्यांनी बनावट नोटा चालवणाऱ्या या आरोपीला पकडून ठेवले व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. हा इसम काही दिवसांपासून भाजी मार्केट परिसरात फिरत असून, अनेक वेळा त्याने या खोट्या नोटा देऊन भाजी विक्रेत्यांना गंडवले होते अशी माहिती येथील काही भाजी विक्रेत्यांनी दिली. यात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणात पालघर पोलीस पुढील तपास करीत आहेत.