राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाली असतानाही अनेकजण अद्यापही प्लास्टिकचा वापर करताना दिसतात. प्लास्टिक वापरण्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी २ ऑक्टोबर रोजी प्लास्टिक वापरणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी गांधीगिरी मार्गाचा वापर केला. भररस्त्यात त्यांनी प्लास्टिक बाळगणाऱ्या दोघांना २५ उठा-बशा काढायला लावल्या.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. थोड्याच वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उठा-बशा काढायला लागलेल्या संतोष पिंगळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रामदास कोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष पिंगळे यांना रोखत प्लास्टिक वापरल्याबद्दल दंड भरण्यास सांगितलं. यावेळी संतोष पिंगळे यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होता. दंड भरु शकत नसल्याचं सांगितल्यानंतर त्यांना उठा-बशा काढण्यास सांगण्यात आलं.

घऱी परतल्यानंतर संतोष पिंगळे यांनी दोन तासांसाठी स्व:तला रुममध्ये लॉक करुन घेतलं होतं. यानंतर मित्रांना घेऊन ते कर्जत पोलीस ठाण्यात गेला.

संतोष पिंगळे एका दुकानात काम करतात. ‘कोकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी १० वेळा मला उठा-बशा काढायला लावल्या. उठा-बशा काढल्यानंतर चिडवत मी पाहिलं नसल्याचं सांगत त्यांनी पुन्हा १५ वेळा मला उठा-बशा काढायला लावल्या. दुसऱ्या व्यक्तीला मी ओळखत नाही’, असं संतोष पिंगळे यांनी सांगितलं आहे. कोकरे यांनी मात्र आपण कोणतीही जबरदस्ती केली नसल्याचा दावा केला आहे.