वर्ध्यात एका स्थलांतरित कामगाराने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या कामगाराचं नाव आहे. विशेष म्हणजे अमरसिंग हे हैदराबाद येथून चालत निघाले होते. त्यांनी चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. पण नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर त्यांना प्रचंड थकवा जाणवू लागला. अखेर थकवा सहन न झाल्याने नैराश्यातून त्यांनी तिथेच एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

गिरड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भर उन्हात सलग चालून त्यांना थकवा आला होता. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास आम्हाला एका शेतकऱ्याने फोन करुन यासंबंधी माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलो असता अमरसिंह यांनी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचं आम्हाला दिसलं”.

पोलिसांना यावेळी अमरसिंह यांच्या खिशात मोबाइल मिळाला. मोबाइल स्वीच ऑफ असल्याने पोलिसांनी तो चार्ज केला आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. “शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटंबाच्या ताब्यात देण्यात आला,” अशी माहिती महेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरसिंह यांच्यासोबत एकूण २० कामगार होते. सर्वजण चालत निघाले होते. रस्त्यात एका ट्रक चालकाने या सर्वांना आपल्यासोबत घेतलं होतं. रस्त्यात जेवणासाठी ट्रक थांबला होता. प्रवास पुन्हा सुरु झाला तेव्हा ट्रक अमरसिंह यांना न घेताच निघून गेला. यामुळे अमरसिंग प्रचंड निराश झाले होते असंही महेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे.