बहिणीला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. अरविंद महादेव वडर (वय २४) व महादेव कल्लापा वडर (५१ रा.दौलतनगर) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी व संशयित आरोपी अरविंद हे दौलतनगर येथे एकाच गल्लीत राहतात. मार्च २०१७ मध्ये अरविंदचे वडील महादेव यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन अरविंदसोबत लग्न लाऊन द्या अशी मागणी घातली होती. मात्र पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याने नकार दिला होता. याचा अरविंद याला राग आला होता.

एके दिवशी अरविंद याने चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने तरुणीला दुचाकीवरून टेंबलाईवाडी येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या लहान बहिणीला ठार मारु अशी धमकी त्याने दिली होती. घरी कोण नसताना तो नेहमी तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार दीड वर्षापासून सुरु होता. मात्र घाबरून याबाबत मुलीने घरात कोणाला सांगितले नव्हते.

दरम्यान १५ दिवसांपूर्वी महादेव वडर यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन १८ वर्ष पूर्ण होताच मुलीला उचलून घेऊन जाणार अशी धमकी तिच्या वडिलांना धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यासंबंधी पीडित मुलीच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अरविंदवर अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्या प्रकरणी (पोक्सो) कायदानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे.