नितीन बोंबाडे

कासाजवळ अपघात विभागाला सुसज्ज रुग्णालयाची गरज

साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, तसेच नऊ  प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. परंतु अनेक वर्षांपासून या रुग्णालयाच्या स्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. येथे बालरोग, स्त्रीरोग, भूलतज्ज्ञ तसेच सिटी स्कॅन, सोनोग्राफी, क्ष-किरण विभाग आणि रक्तपेढी नसल्याची बाब उघड झाली आहे.

मुंबईच्या तुलनेत अत्याधुनिक सोयीसुविधा नसल्याने गंभीर आजारी वा अपघातात जबर जखमी झालेल्या रुग्णांना मुंबई-वापी-सिल्व्हासा वा वलसाड येथे नेण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान तेथे पोहोचण्यास उशीर होत असल्याने अनेकदा रस्त्यातच जखमी दगावतात. त्यामुळे कासा येथे अपघात विभाग उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

डहाणूच्या पूर्वेकडे अनेक आदिवासी गावे कासा उपजिल्हा रुगणालयाला जोडली आहेत. मात्र तेथे अत्यावश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे शासनाने डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मध्यवर्ती ठिकाण सुसज्ज रुग्णालय उभे करण्याची मागणी होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असून जखमी रुग्णांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते.

मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर काही वैद्यकीय अधिकारी अन्य ठिकाणी काम करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना कासा उपजिल्हा रुग्णालय यातना केंद्र बनले आहे. कासा उपजिल्हा रुगणालयात रुग्णांना तपासून वापी वा मुंबई येथे हलवण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

कासा उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत सोमटा, तवा, सायवन, तलवाडा, गंजाड, ऐना, धुंदलवडी या भागांचा समावेश होतो. तर अनेक आदिवासी पाडे या भागाला जोडले गेले आहेत. या परिसरातील गंभीर आजारी रुग्णांना कासा रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु, या रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

डहाणूत शासनाच्या उदासीन धोरणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्तसाठा, औषधसाठा बरोबरच रुग्णालयात जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने परिसरातील सुमारे ७० टक्के आदिवासी रुग्णांना उपचारासाठी सिल्व्हासा तसेच गुजरात राज्यातील रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

‘डहाणूच्या दोन्ही रुगणालयांत मोठय़ा आजारांवर शस्त्रक्रिया होत नाहीत. दाखल रुग्णांनी सिल्व्हासाच्या विनोबा भावे रुग्णालयात वा वापीतील रुग्णालयात हलविण्यात येते. त्यामुळे डहाणू, कासा येथील रुग्णालये ही असून नसल्यासारखीच आहेत.

– हरबन्स सिंग, चारोटी

अपघात विभागासाठी अस्थितज्ज्ञ, जनरल सर्जन ही पदे निर्माण करावी लागतात. त्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही.

– डॉ. कांचन वानेरे, सिव्हिल शल्यविशारद