गावकऱ्यांना किमान किंमतीत किराणा विक्री

लोकसत्ता, प्रशांत देशमुख 

वर्धा : मोठय़ा दुकानांतून स्वच्छ किराणा साहित्य घेण्याची शहरवासियांना आता सवयच झाली आहे. ग्रामीण भागात हा प्रकार नावालाही नाही. मळकटलेल्या दुकानातून किरकोळ साहित्य उधारीवर घेण्याचे प्रकार गावांत अजूनही सुरूच आहेत. त्याला छेद देत मोठय़ा दुकानांच्या तोडीचा स्वच्छ किराणा विकणाऱ्या दहा महिलांनी व्यवसायाचा नवा मंत्र दिला आहे. ग्राहकांना किमान किंमतीत किराणा विकणाऱ्या या महिला आता ‘लखपती’ झाल्याच. पण, ही त्यांची कामगिरी राज्यातही अव्वल ठरली आहे.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ अभियानातून सेलू तालुक्यातील हिंगणी या गावात ‘वॉलमार्ट’ची ही छोटी प्रतिकृती भरभराटीस आली आहे. राज्यातील महिला बचतगटांची पंढरी म्हणून वर्धा जिल्हय़ाची ओळख सर्वत्र दिली जाते. जिल्हय़ात १४ हजार ५५६ गटांच्या माध्यमातून १ लाख ३३ हजार महिला ‘उमेद’  अभियानाशी जुळल्या आहेत. कर्जफेड करण्यात सर्वात तत्पर ग्राहक म्हणून बँकांची प्रशस्ती मिळालेल्या या गटांना गत दहा वर्षांत दोनशे कोटी रूपयांचा पतपुरवठा झाला आहे. नेकीने त्याची परतफेड झाल्याने या बचतगटांची नवनवे व्यवसाय करण्याची उमेद उंचावतच गेली. हिंगणीचा स्वामी स्वयंसहाय्यता बचतगट यांत सर्वात आघाडीवर होता. ‘उमेद’च्या माध्यमातून नोंदणी झाल्यानंतर गावातील दहा महिलांनी २००९पासून व्यवसायास सुरूवात केली. अध्यक्ष प्रमिला कामडी व सचिव नलू सहारे यांनी या महिलांसोबत मिळून हिंगणीत एका टिनाच्या शेडमध्ये किराणा दुकान थाटले. बँकेकडून पन्नास हजार रूपयाचे कर्ज मिळाले. वर्धेतून किराणा आणायचा व तो नाममात्र नफा मिळवून विकायचा. पारंपरिक दुकानांशी स्पर्धा करीत या महिलांनी आपले दुकान आदर्श केले.  सुरुवातीला दिवसाकाठी दोनशे रूपये मिळणारा नफा पाहता पाहता पाचशे रुपयांवर पोहोचला. पंचक्रोशीतील महिला याच दुकानात वळायच्या. मासिक सभेत नफ्या- तोटय़ाचा हिशोब होतो. नफाच पदरी पडल्याने दहाही महिला नफ्याचे समान वाटप करतात. या हिशोबाने प्रत्येकीला गत तीन वर्षांत दोन ते तीन लाख रूपये मिळाले. कधीकाळी रोजंदारीवर कष्टाचे काम करणाऱ्या या महिलांनी स्वबळावर कुटुंबाला सुगीचे दिवस आणले. गटाचा व्यवसाय करतांनाच प्रत्येकीने शेती, शेवया विक्री व शेळी पालनाचा स्वतंत्र व्यवसायही केला.

जिल्हा उमेद उपक्रमाच्या व्यवस्थापक स्वाती वानखेडे म्हणाल्या, व्यवसायातील सातत्य व सातत्यपूर्ण नफा हे स्वामी बचतगटाचे बलस्थान आहे.  कर्जफेडीतील तत्परता दिसून आल्याने राज्यशासनाने आतापर्यत  दोन लाखाचे व्याज माफ  केले आहे.आता आमचे काम पाहण्यास इतर गावातील महिला येतात.

राज्यात अव्वल

राज्यात लाखो गट कार्यरत आहेत. पण हिंगणीचा हा स्वामी गट कार्यपद्धती, कर्जफेड, नफा, व्यवसायवृद्धी, सातत्य व चोख हिशोब या निकषावर राज्यात अव्वल ठरला. महिलादिनी दिल्लीत आयोजित समारंभात एक लाख रूपयाचा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला जाणार आहे. पुरस्काराच्या रकमेतून बकरीपालनाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात करण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली. हिंगणीच्या या दहा ‘लखपती लेकीं’पैकी एकही दहावीदेखील उत्तीर्ण नाही. ४५ ते ७० दरम्यान वय असणाऱ्या या महिलांनी बचतगटाचे काम करतांनाच वृक्षारोपण, दारूबंदी, गरजू मुलांना गणवेश वाटप, आरोग्य शिबिर, तंटामुक्ती मोहिम असे उपक्रम राबविले आहेत.