करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी वेगात येणाऱ्या एका  वाहनाला थांबण्याचा केलेला प्रयत्न एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीवावर बेतला. या घटनेतील मृत पोलीस कर्मचाऱ्याने या वाहनास अगोदर थांबण्याचा इशारा केला होता, मात्र वाहनचालकाने वाहन तर थांबवलेच नाही उलट अधिक वेगात पळवले. वाहन थांबवले जात नसल्याचे पाहून या कर्मचाऱ्याने पाठलाग करून ते वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनचालकाने वाहन थेट या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातले. या मध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा  मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर-विजापूर महामार्गावर सोलापूरपासून जवळच असलेल्या वडकबाळनजीक हा प्रकार घडला.

रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३०, रा. भवानीपेठ, सोलापूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. या घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तातडीने  घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व मृत पोलीस कर्मचा-याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेऊन वाहनासह चालकाला ताब्यात घेतले. गौस नबीलाल कुरेशी (वय ३१, रा. पाच्छा पेठ, सोलापूर) असे वाहनचालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. सोलापूर-विजापूर महामार्गावर वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथेही नाकेबंदी केंद्र आहे. येथे पहाटे पाच वाजेच्या सुमारास विजापूरकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात बोलेरे पिकअप वाहन येत असल्याचे पाहून, तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ते वाहन इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला.  मात्र, वाहनचालकाने वाहन न थांबविता तसेच भरधाव वेगाने पुढे नेले. त्या वाहनाचा क्रमांक पूर्णपणे मिटलेला होता, वाहनामध्ये चालकासह अन्य एक व्यक्ती देखील होती, पाठीमागे लाकडी फळ्या बांधलेल्या होत्या. त्यातून प्रवासी वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे पोलीस नाईक रामेश्वर परचंडे व गृहरक्षक जवान जीवन देशमाने यांनी त्या वाहनाचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. पुढे काही अंतरावर समशापूर ते नंदूर रस्त्यावर पोलीस नाईक रामेश्वर परचंडे यांनी त्या वाहनाला अडविले. परचंडे हे मोटारसायकलवरून खाली उतरून पुढे येत असताना त्या वाहनचालकाने  वाहन सुरू करून परचंडे यांना जोराची धडक मारून खाली पाडले. नंतर त्यांच्या अंगावरून वाहन घालून त्यांना गंभीर जखमी देखील केले.  या प्रकारानंतर  घटनास्थळावरून वाहनचालक वाहन घेऊन सुसाट निघून गेला.

दरम्यान, या घटनेनंतर अन्य पोलिसांनी तेथे धाव घेऊन जखमी परचंडे यांना सोलापुरातील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना पोलीस नाईक परचंडे यांचा मृत्यू झाला. या नंतर पोलिसांनी शोध घेऊन  वाहनचालक कुरेशी यास अटक केली. तसेच, त्याच्या विरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.