पुणे-बंगळूरू महामार्गावरील शिरवळ तपासणी नाक्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या तपासणी नाक्यावर ते बहुतांशी वेळ कर्तव्य बजावत आहेत. त्यातूनच त्यांना करोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शिरवळ पोलीस ठाण्यात व सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

करोनाची लागण झालेले संबंधित पोलीस उपनिरीक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांची शिरवळ पोलिस ठाण्यात पहिलीच नियुक्ती आहे. मुंबई, पुणे, राज्यातील इतर जिल्हे व परप्रांतातून सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची तपासणी या शिरवळ चेकपोस्ट केली जात आहे. या ठिकाणी दररोज हजारो लोकांशी पोलिसांचा संपर्क येत आहे.

शिरवळ तपासणी नाक्यावर रविवारी पोलिसांची करोना चाचणी घेण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर इतर कर्मचाऱ्यांचे निगेटिव्ह आले. यामुळे सातारा पोलीस दलात पहिल्यांदाच करोनाबाधित कर्मचारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून शिरवळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या निकटच्या सहवासातील काही पोलिसांचे विलीगीकरण करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतली होती. वेळोवेळी त्यांच्या तपासणीसह त्यांना दिवसातून दोन वेळा होमिओपॅथीची औषधे दिली जात होती. तरीही ही घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्याला पाचगणी येथील करोना आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.