सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशभरात एकीकडे ठिकठिकाणी निदर्शने केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात आज सकाळी लोका अधिकार मंचच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.

यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या कायद्याच्या समर्थनात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. शिवाय हा कायदा कोणाच्याही विरोधात नाही तर देशाहितासाठी असल्याच्याही प्रतिक्रिया देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये या कायद्याबद्दल विरोध प्रदर्शन करण्यात आले होते.

हा मोर्चा नागपूरमधील संविधान चौकात पोहचल्यानंतर यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री निती गडकरी हे देखील सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवया या ठिकाणी एक सभा देखील होऊ शकते असे देखील सांगितले जात आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) बद्दल जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता विशेष दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला आहे.