09 March 2021

News Flash

वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर ‘नीलपंख’चे शिल्प लावले जाणार

सेवाग्राम विकास आराखडा समितीने मान्यता दिली; पालकमंत्री सुनील केदार यांची देखील सहमती

प्रतिकात्मक छायाचित्र

शहर पक्षी ठरलेल्या नीलपंखाचे शिल्प वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यास सेवाग्राम विकास आराखडा समितीने मान्यता दिली आहे. यासाठी बहार नेचर फाउंडेशन या पक्षीप्रेमी संघटनेने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री सुनील केदार यांनी या नीलपंखाचे शिल्प वर्धा शहराच्या प्रवेशद्वारासोबतच शहरातील मुख्य चौकात लावण्याचे मान्य केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज (शुक्रवार) बहारच्या कार्यकारिणी मंजूर करण्यात आला.

वर्धा येथे २२ ऑगस्ट हा शहरपक्षी दिन म्हणून पाळल्या जातो. २२ ऑगस्ट २०१८ रोजी शहरपक्षी ठरविण्यासाठी निवडणूक घेण्यात आली होती. वर्धा नगर परिषद व बहार तर्फे आयोजित ही पक्षी निवडणूक महाराष्ट्रातील दुसरी तर विदर्भातील पहिली निवडणूक ठरली होती. पक्षांचे महत्व नागरिकांपर्यत पोहोचविण्याच्या या उपक्रमात ५२ हजार वर्धेकरांनी मतदान केले होते.

वर्धा परिसरात आढळणाऱ्या चार पक्षांपैकी सर्वाधित मतदान नीलपंख या पक्षास मिळाल्याचे ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी त्यावेळी जाहीर केले होते. या उपक्रमाची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. बहारने यासोबतच पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य वन्यजीव मंडळाने ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच राज्यात पक्षी सप्ताह साजरा होईल. या पार्श्वभूमीवर शहरपक्षी नीलपंखाचे शिल्प पक्षी सप्ताहापर्यत उभारण्याची मागणी बहारतर्फे आज जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आली.

नागरिकांनी आपल्या परिसरात नीलपंखाचे चित्र तसेच विविध पक्षांची माहिती प्रदर्शित करून शहरपक्षी दिवस साजरा करावा, असे आवाहन बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. शहरपक्षी दिनानिमित्य शनिवारी सकाळी आठ वाजता ऑक्सिजन पार्क परिसरात पक्षीज्ञान फलक उभारून हा दिवस साजरा केल्या जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 7:05 pm

Web Title: a sculpture of nilpankh will be installed at the entrance of wardha city msr 87
Next Stories
1 सिनेकलावंतांना मुभा, लोककलावंतांना का नाही?; कलाकारांचा शासनाला सवाल
2 चंद्रपूर : देवपायली गावात बिबट्याचा धुमाकूळ; युवकावर हल्ला
3 करोनाची ‘ती’ कॉलर ट्यून आता बंद करा, कारण…; मनसे नेत्याची मागणी
Just Now!
X