News Flash

४५ वयापुढील साडेपाच लाख लोकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध नाही!

राज्याची केंद्राकडे तातडीची मागणी

महाराष्ट्रात ४५ वयापुढील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटून गेलेले जवळपास साडेपाच लाख लोक कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप या लोकांसाठी कोव्हॅक्सिनच्या लसीचा साठा देण्यात आलेला नसल्याने साडेपाच लाख लसी ताबडतोब उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

भारतात आजघडीला भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन व सीरम कंपनीची कोव्हीशिल्ड या दोन लसी उपलब्ध आहेत. याशिवाय आगामी काळात स्पुटनिक ही रशियाची लस उपलब्ध होणार आहे. सध्या कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता दीड कोटी तर कोव्हीशिल्डची क्षमता सहा कोटी आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना अनुक्रमे दीड हजार कोटी व तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे या कंपन्यांकडून आगामी काळात सहा कोटी व दहा कोटी लसींचे उत्पादन होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

लसींचे सध्याचे एकूण उत्पादन लक्षात घेता १८ ते ४४ वयोगटातील लोकांना १ मे पासून लसीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे देशभरात एकच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. यापूर्वी डॉक्टर व आघाडीचे आरोग्य रक्षक तसेच ४५ वयापुढील लोकांना लस देण्याचे केंद्राचे धोरण होते. महाराष्ट्रात सध्या ४५ वयापुढील ९,३९,५७५ लोकांचा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील ५,४०,०५६ लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला याला चार आठवडे उलटून गेले असून अनेकांचे सहा आठवडे झाले आहेत. हे सर्वजण म्हणजे साडेपाच लाख लोक दुसरा डोस कधी मिळेल या प्रतिक्षेत असून अद्याप केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिनच्या लसींचा पुरवठा करण्यात न आल्यामुळे ४५ वयापुढील लोकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ७ मे २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भुषण यांना पत्र लिहून तातडीने कोव्हॅक्सिनच्या साडेपाच लाख लसी पाठविण्याची विनंती केली आहे.

४५ वयोगटापुढील लोकांना लस देताना राज्य सरकारने लसींचा कोणताही बफर साठा करू नये असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारनेही कोव्हॅक्सिनचा कोणताही साठा केला नव्हता. याची स्पष्ट जाणीव करून देत डॉ प्रदीप व्यास यांनी आता पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटलेल्या साडेपाच लाख लोकांसाठी तात्काळ कोव्हॅक्सिन लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे ते सहा आठवडे पूर्ण झालेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस देण्याबाबतचे धोरण सर्वोच्च प्राधान्याने सुस्पष्ट करावे असेही डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्राला केंद्राकडून कोणत्या वेळेत किती लशींचे डोसेस मिळतील, लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य सरकार किती किमतीला किती प्रमाणात लस घेऊ शकते आदी काही मुद्द्यांवर अजूनही केंद्राकडून स्पष्टता मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात ४५ वयापुढील किती लोकांचे लसीकरण झाले व त्यातील किती लोकांना चार आठवड्यानंतर लस द्यावी लागणार हे वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले होते तरीही केंद्राकडून तरीही केंद्राकडून कोव्हॅक्सिनच्या पुरेशा लसी न मिळाल्याने साडेपाच लाख लोक दुसऱ्या लसीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 9:02 pm

Web Title: a second dose of covaxin is not available for 5 lakh 50 thousand people over the age of 45 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार!
2 “दर्जेदार काम करा नाहीतर काळ्या यादीत टाकू”, अशोक चव्हाणांचा कंत्राटदारांना इशारा
3 करोनावरील जीवरक्षक इंजक्शन पुरवठ्यासाठी राज्याचे केंद्राला साकडे!
Just Now!
X