शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या तालुक्यातील निपाणीवडगाव व वडाळामहादेव येथील प्रचार सभेत शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखविले. त्यामुळे सभा न घेताच त्यांना माघारी फिरावे लागले. तर शिरसगाव येथे गारपीटग्रस्त शेतक-यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
खासदार वाकचौरे हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही गावांत प्रचार सभांचेही आयोजन केले जाते. पण त्यांना पक्षांतरामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता गारपीटग्रस्तांची भर पडली आहे. खासदार वाकचौरे यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर आदी असले तरी त्यांची भूमिका सावध आहे. स्थानिक कार्यकर्ते व लोक दुखावले जाणार नाहीत त्यामुळे ते प्रचारात सबुरीची भूमिका घेतात. आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही वाकचौरे यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याने आणखी पेच वाढला आहे.
गुरुवारी वाकचौरे हे ससाणे, गुजर यांच्या समवेत वडाळामहादेव येथे सभेसाठी आले त्या वेळी शिवसेनेचे शरद पवार, बाळासाहेब राऊत, पांडुरंग पवार, सोमनाथ िशदे, बाबासाहेब काळे, बाबासाहेब राऊत, आबा काळे यांनी घोषणाबाजी सुरू केली. नंतर निपाणीवडगाव येथे गणेश कऱ्हाड, सुधा तावडे, संभाजी कऱ्हाड, रणजित कवडे यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. काँग्रेसचे मुरली राऊत, नवशिराम एकनर, नाथा मांजरे यांच्याशी निदर्शकांची वादावादी झाली. मातापूर येथेही घोषणाबाजी करण्यात आली.
शिरसगाव येथे सभेसाठी वाकचौरे हे गेले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाहून ते थांबले. या वेळी तुम्ही केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेता. गारपीटग्रस्तांना न्याय दिला नाही. म्हणून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. या वेळी गोंधळ झाला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मध्यस्थी केल्याने वाद शमला. खासदार वाकचौरे यांनी कामात मी राजकारण केले नाही, पक्षभेद केला नाही. यापुढेही आपली ही भूमिका राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार या वेळी घडला नाही.