“वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग लागली व ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग अधिकच वाढली. घटनास्थळी असलेले ज्वलनशील पदार्थ ही आग भडकण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या अग्नितांडावात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी बोलताना पत्रकारपरिषदेत दिली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.

यावेळी टोपे म्हणाले, “आताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या एमएसझेड या मांजरी येथील फॅक्टरीतील एसईझेडी-३ या इमारतीस आग लागल्याची होती अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणा रोटा व्हायरस प्लांट इन्स्टॉलेशनचं काम सुरू होतं. ज्यामध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं. दरम्यान दुपारी दोन वाजता आग लागली होती. त्यानंतर घटनास्थळी महापालिकेचे पाच टँकर व अन्य तीन टँकर असे तात्काळ बोलावण्यात आले होते. आग आटोक्यात आलेली आहे. संपूर्ण आग विझवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. आग विझवल्यानंतर आतमध्ये पाहणी केली असता पाच मृतदेह आढळून आले.” असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून मिळालेली आहे.

तर, “कोविडशील्ड वॅक्सीनची इमारत आगीच्या ठिकाणापासून लांब आहे. त्यामुळे या इमारतीस व वॅक्सीनचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील घटनास्थळावरून संपूर्ण माहिती घेतलेली आहे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या सर्व प्रकरणाचा तपास केला जाईल, असं सांगितलं आहे.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.