News Flash

मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात वाघाचा अधिवास; तब्बल ४५० किमीचा प्रवास

दीड महिन्यापासून वावर असल्याचा वनअधिकाऱ्यांचा अंदाज

मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात पहिल्यांदा वाघाचे दर्शन झाले आहे. पांढरकवठा येथून ४५० किलोमीटरचा प्रवास करुन वाघ आला असल्याचं वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांचा या नर वाघाचे ठसे तुषार पवार या वन्यजीवप्रेमी आणि खवल्या मांजरावर संशोधन करणाऱ्या तरुणाला आढळून आल्यानंतर ही बाब त्याने वनविभागाला सांगितली. तत्पूर्वी वनविभागातील एका कर्मचाऱ्यासही या भागात वाघाचे ठसे असावेत अशी शंका आली होती.

दरम्यान बुलढाण्यावरुन एक वाघ रेंजच्या बाहेर गेल्याने त्याचा शोध सुरू होता. या दरम्यान गौताळयातील या वाघाची माहिती गोळा करण्यात आली. तो पांढरकवडा भागातून गौताळा येथे आला असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाचे पंजे दिसून आल्यानंतर त्याला अधिवास आहे काय, याचा शोध घेण्यासाठी कॅमेरा देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. त्यात त्याचे छायाचित्र कैद झाले. गौताळा क्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी राहुल शेवाळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

गौताळा अभयारण्यात बिबटयांचा अधिवास आहे पण वाघाच्या पाऊलखुणा अलीकडेच दिसून आल्या. १५ दिवसांपूर्वी खवल्या मांजरावरील संशोधन करणाऱ्या तुषार पवार यांना वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही गोष्ट वनअधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर कॅमेरा लावून नजर ठेवण्यात आली. त्याचे छायाचित्र कैद झाल्यानंतर तो वाघ कुठून आला याचा शोध सुरू झाला. आईपासून वेगळे झाल्यानंतर स्वत:चे क्षेत्र ठरविण्यासाठी त्याने ४५० किलोमीटरचा प्रवास केला असावा. तो फिरस्ती वाघ असल्याने मराठवाड्यात त्याचा अधिवास होईल काय याविषयी शंका आहेत. पण मादी वाघ या भागात आली तर तो गौताळा अभयारण्यात राहू शकतो असे सांगण्यात येत आहे. गौताळा अभयारण्य वाघांच्या अधिवासास उपयुक्त आहेत.  नैर्सगिक आणि कृत्रिम पाणवठे आणि अन्नसाखळी या भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातच गौताळा हे मोठे वनक्षेत्र आहे. अन्य मराठवाड्यातील एकूण क्षेत्रफळाच्या केवळ ०.४ वनक्षेत्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:48 pm

Web Title: a tiger in gautala forest reserve marathwada sgy 87
Next Stories
1 सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेकडून मंजूर
2 अंबानी प्रकरणात गृहमंत्रीपद जाणार?: शरद पवार भेटीनंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
3 वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप