औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस ठाण्यातून पसार झालेला उंटाची तस्करी करणारा एक ट्रक येडशी (जि. उस्मानाबाद) येथे महामार्ग पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी ट्रकसह १४ ऊंट ताब्यात घेऊन उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. या कारवाईमुळे उंटाची तस्करी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला आळा बसण्यासाठी मदत होईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद (सातारा) पोलिसांनी शुक्रवारी उंटाची तस्करी करणारे दोन ट्रक पकडून पोलीस ठाण्यात उभे केले होते. मात्र दोन्ही ट्रक तस्करांनी पळवून नेले.

याबाबत औरंगाबाद पोलिसांनी पळविलेल्या ट्रकबाबत (एचआर ७४ ए ९९५४ आणि एचआर ७४ ए ९४६७) महामार्ग पोलिसांना कळविले. त्यावरून महामार्ग पोलीस केंद्राचे उस्मानाबाद येथील कर्मचारी पोलीस नाईक कपिल बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल मयुर फुलवरे यांनी शुक्रवारी रात्री येडशी टोलनाका येथे जाऊन सदर ट्रकबाबत माहिती दिली होती. दोघे पोलीस कर्मचारी तेथे पाळत ठेवून होते. दरम्यान, औरंगाबाद येथून पसार झालेला एक ट्रक (एचआर ७४ ए ९९५४) हा औरंगाबादहून सोलापूरच्या दिशेने जात असताना आढळून आला.

पोलिसांनी ट्रकसह १४ ऊंट ताब्यात घेऊन आरोपी चालक महंमद हमजाद सादिक हमजाद (वय ३५ रा. घसेडा (हरियाणा)) यास ताब्यात घेतले आहे. महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.