बेकायदा गुरांची वाहतुक करणाऱ्यांनी तपासणी नाक्यावरील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर भरधाव वाहन घातल्याचा खळबळजनक प्रकार चंद्रपुरात घडला आहे. या घटनेमध्ये पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, नागपूर-चंद्रपूर महामार्गावर खंबाडा चेकपोस्ट येथे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी रस्त्त्यावर बॅरिकेट्स टाकून पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, गुरांची बेकायदा वाहतुक करणारे एक वाहन भरधाव वेगाने येत होते. चेकपोस्टवर बॅरिकेट्स लावून हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांनी केला. मात्र, या गुरांची तस्करी करणाऱ्या या मुजोर लोकांनी वाहन न थांबवता थेट बॅरिकेट्सवर गाडी चढवली, यामध्ये मेश्राम यांच्या अंगावरुन ही भरधाव गाडी गेली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अशा प्रकारे कर्तव्यावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर भरधाव वाहन चालवून त्याचे प्राण घेण्याच्या घटनेमुळे चंद्रपुरातच यापूर्वी घडलेल्या पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. दारु तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिडे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा या मुजोर तस्करांनी जीव घेतला होता. कर्तव्यावर असताना हा प्रकार दुर्देवी प्रकार घडल्याने राज्य शासनाने त्यांना शहीदाचा दर्जा दिला होता.