दिवा स्थानकात रेल्वेने दिलेल्या धडकेत एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्यासोबत असणारी 60 वर्षीय बहिण जखमी झाली आहे. महिला पुण्याची रहिवासी असून आपल्या नातीला भेटण्यासाठी आली होती. दिवा स्थानकात सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने त्यांना धडक दिली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता पवार (50) आणि कांताबाई साळुंखे (60) कल्याणला जात असताना हा अपघात झाला. सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. ‘प्राथमिक विधासीठी दोन्ही महिला ट्रॅकवर गेल्या होत्या. मात्र यावेळी समोरुन ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही’, असं पोलिसांनी सांगितल आहे.

अपघातानंतर कांताबाई यांना व्हीलचेअरच्या सहाय्याने महिला डब्यातून ठाण्याला नेण्यात आलं. दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता संगीता यांना मृत घोषित करण्यात आलं. कांताबाई यांना आधी ठाणे आणि नंतर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

ज्या नातेवाईकांना त्यांना दिवा स्थानकात सोडलं त्यांनी सांगितल्यानुसार, संगीता यांच्या नातीचं ऑपरेशन होणार आहे. संगीता आपल्या मुलासोबत तर कांताबाई पतीसोबत मुंबईत आल्या होत्या. काही नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर कल्याणहून पुण्याला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी त्या चालल्या होत्या.

‘दोघींनाही मुंबईतील रेल्वे वाहतुकीची कल्पना नव्हती. त्यामुळेच त्यांना समोरुन ट्रेन येताना कळलं नसावं’, अशी माहिती नातेवाईकाने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवा स्थानकात रुग्णवाहिका नसल्याने जखमी महिलेला लोकलमधून नेण्यात आल्याचं सांगत प्रशासनावर टीका केली आहे.