पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला विरारची रहिवासी आहे. 2016 मध्ये माया गुप्ता यांचा पती संतोषकुमार याने विरारमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वसई सत्र न्यायालयाने पत्नी मायाला आत्महत्येसाठी दोषी ठरवलं होतं.

संतोषकुमार यांच्या आईने माया गुप्ताविरोधात तक्रार दाखल करत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. माया गुप्ता वारंवार संतोषकुमारला आपल्या प्रियकरासोबतचा फोटो पाठवून त्रास देत होती अशी माहिती त्यांनी तक्रारीत दिली होती.

माया गुप्ता आणि संतोषकुमार यांचं लग्न कुटुंबीयांनी ठरवलं होतं. लग्नानंतरही माया गुप्ता आपल्या प्रियकराच्या संपर्कात होती. जेव्हा संतोषकुमारला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळलं तेव्हा त्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तिने आपण नात्यात असल्याचं मान्य केलं, मात्र ते संपवण्यास नकार दिला. भांडणानंतर घर सोडून ती आपल्या आई वडिलांच्या घरी निघून गेली.

यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबतचे फोटो संतोषकुमारला पाठवत त्रास देण्यास सुरुवात केली. तिने पैशांची मागणी करत दिले नाही तर अजून त्रास देऊ असं धमकावलंही होतं. अखेर त्रासलेल्या संतोषकुमारने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला.

संतोषकुमारच्या आईने आपला मुलगा प्रचंड मानसिक तणावात गेला होता अशी माहिती न्यायालयात दिली. संतोषकुमार याने पुन्हा एकदा सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असता सासू-सासऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं.