रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतू शकतं हे माहित असतानाही अनेकदा प्रवासी निर्धास्तपणे रुळ ओलांडताना दिसतात. अशाच पद्धतीने रुळ ओलांडणे एका ६० वर्षीय महिलेच्या जीवावर बेतलं असतं. पण सुदैवाने महिला बचावली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

कमल मोहन शिंदे अशी या महिलेची ओळख पटली आहे. खंबालपाडा येथील त्या रहिवासी आहेत. फुटओव्हर ब्रीजचा वापर न करता कमल शिंदे यांनी रेल्वे रुळ ओलांडून १ नंबर प्लॅटफॉर्मवरुन २ नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दीड वाजण्याचा सुमारास हा प्रकार घडला.

डोंबिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महिला रेल्वे रुळावर येताच स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी समोरुन ट्रेन येत असल्याचं सांगत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशी ओरडून तिला आवाज देत होते. काही प्रवाशांनी तिला रेल्वे रुळावरच झोपण्याचा सल्ला दिला. सुदैवाने मोटरमननेदेखील महिलेला रुळावर झोपताना पाहिलं होतं आणि त्यांनी लोकलचा वेग कमी केला’.

‘दोन डबे कमल यांच्या अंगावरुन गेले. लोकल वेळेत थांबल्याने सुदैवाने त्यांनी गंभीर जखमा झाल्या नाहीत. त्यांना काही किरकोळ दुखापत झाली आहे. ज्येष्ठ नागरिक असल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांच्या कुटुंबाला घटनेती माहिती दिली’, असंही एस पवार यांनी सांगितलं आहे.