सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून ठाकरे सरकारकडून स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मराठा आऱक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तरुणाने याचा उल्लेख केला आहे.

बीडच्या केतूरा गावात ही घटना घडली आहे. १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चिठ्ठीत काय लिहिलं आहे –
मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…

पार्थ पवार यांनी ट्विट करत विवेकच्या आत्महत्येवरुन रोष व्यक्त केला आहे. “मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन अर्ज दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”.