काँग्रेस-राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच राहिलेले नाहीत, त्यामुळे निवडणूक ‘ईव्हीएम’वर, बॅलेट पेपरवर किंवा हात वरून करून घेतली तरी, भाजपचेच सरकार येणार आहे. यापूर्वी आपण ‘अब की बार २२० पार’ असे म्हणत होतो ,परंतु आता तर ‘२८८ पार’ असे म्हणण्यासारखे महाराष्ट्रातील राजकीय चित्र असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप विजय संकल्प बुथ मेळाव्यात उंब्रज (ता. कराड) येथे पाटील बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरे न्यासाचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, उपाध्यक्ष मनोज घोरपडे यांची उपस्थिती होती. मेळाव्यात सरकार कँम्पसचे चंदन शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

विरोधक पोरं पळवण्याचा आरोप आमच्यावर करतात, पण उदयनराजे, शिवेंद्रराजे पोरं आहेत का? अशी मिश्कील टिपणी पाटील यांनी केली. बांधावर बसून पाहणारे आता भाजपात उडय़ा घेऊ लागले असल्याचे ते म्हणाले. विधानसभेला विरोधकांकडे उभे राहण्यासाठी माणसं शिल्लक राहणार नसल्याची वस्तुस्थिती असून, भाजप-शिवसेनेची महायुती ही होणारच आणि कराड उत्तरमधील आमचे उमेदवार मनोज घोरपडे हे निवडून येणारच असा ठाम विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत, याचे विरोधकांना आश्चर्य आहे. जिंकलेल्या निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून नाही तर बुथ कार्यकर्त्यांच्या कामाचे यश आहे.

निवडणूक सुद्धा एक युद्ध आहे. त्याची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. सरकारने पाच वर्षांत काय काम केले याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ३७०, ३५ अ कलम रद्द, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम या सरकारने केले आहे. टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी भागापर्यंत नेले आहे. जे मागील ६० वर्षांत झाले नाही, ते भाजप सरकारने पाच वर्षांत करून दाखवले आहे. कोर्टाच्या माध्यमातून राममंदिराचा प्रश्न पुढच्या आठवडय़ात निकाली लागण्याची चिन्हे आहेत.

शेखर चरेगावकर म्हणाले,की काँग्रेस-राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रेतून भाजप सरकारवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. नकली राजे त्यांच्याकडे आणि खरे राजे आमच्याकडे आले आहेत. ज्या अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीका केली होती, तेच आता तिकडे जाऊन भाजपवर टीका करत आहेत. त्यांचे व्हिडीओ संपूर्ण मतदार संघात दाखवा म्हणजे जनतेसमोर सत्य येईल. खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास तशाच पद्धतीचे उत्तर दिले जाईल असा इशाराही चरेगावकर यांनी दिला. मनोज घोरपडे म्हणाले, उत्तरच्या विद्यमान आमदारांनी हणबरवाडी-धनगरवाडी योजना झुलवत ठेवली आहे. पंचवीस वर्षांत कराड उत्तरचा विकास झाला नाही. तो भाजप सरकारने या पाच वर्षांत करून दाखवला आहे.