करोनाचा प्रसार रोखण्यात आणि उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत महाराष्ट्र भाजपानं आंदोलनाची हाक दिली. भाजपाचं आंदोलन राज्यात सुरू असून, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी फोटो ट्विट करून हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

करोना साथरोग नियंत्रणात राज्य सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपानं माझं अंगण रणांगण आंदोलन सुरू केलं. राज्यभरात आंदोलन होत असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर येऊन निर्दशनं करत आहेत. या आंदोलनातील एक फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- मराठीत कळत नसेल, तर गुजरातीतील एक म्हण यांना योग्य; शिवसेनेकडून भाजपाला उत्तर

“हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात केलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. करोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

भाजपाच्या आंदोलनावर शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी टीका केली आहे. भाजपानं आंदोलनाची हाक दिल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेनं भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.