राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येणारे ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी आंदोलन सुरू केलं आहे. सोशल मीडियातून याविषयी अभियान चालवले जात असून, यात आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पुढाकार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, मिरज, सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू असून, महामार्गाच्या नियोजित कामात मिरज तालुक्यातील भौसे गावाच्या हद्दीत असलेले ४०० वर्षे जुने वडाचे येत आहे. कामात अडथळ येत असल्यानं हे झाड तोडण्यात येणार असून, त्याला वृक्ष प्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात आंदोलन सुरू करण्यात आलं असून, वटवृक्ष तोडू नये, अशी मागणी केली जात आहे.

या वृक्ष प्रेमींच्या मागणीसंदर्भात राज्याचे पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे. “नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे ४०० वर्ष पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्यानं वटवृक्ष तोडावा लागेल किंवा पर्यायी जागेवरून रस्ता करावा लागेल असं मिरज येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे सदर वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच परिसरातील होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता भोसे येथील संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन (मार्ग बदलून) काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करावी,” अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांनी केली आहे.

आणखी वाचा- “स्वतःच्या मुलाला तरी परीक्षेला पाठवू का?, यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावं”

४०० वर्ष जुना वटवृक्ष तोडू नये यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून झाडाच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर पर्यावरण प्रेमींनीही प्रतिकात्मक चिपको आंदोलनाची हाक दिली आहे.