करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यात अजूनही निर्बंध लागू आहेत.  राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये करोना निर्बंधं अद्यापही पूर्णपणे शिथिल करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र निर्बंधांवर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“काही ठिकाणी जिथे रुग्ण वाढताहेत तिथे काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात जितके रुग्ण कमी झाले होते, तितके कमी झालेले नाहीत. पुढच्या काही दिवसात आपल्याला निर्बंध शिथिल होताना दिसतील. हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. काही जम्बो सेंटर आणि रुग्णालयं रिकामी आहेत, याचा अर्थ आपल्याला ती भरायची आहेत असा होत नाही. या आठवड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील,” असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना हायकोर्टाने ठाकरे सरकारला केली आहे. हायकोर्टात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली. दरम्यान गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत?; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

राज्यात रविवारी ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ११० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज १५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात एकूण ६०,९४,८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१०,१९४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३२९८ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.