शिवसेना आणि पक्षाची नेतेमंडळी कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही, असा टोला महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षांना लगावला. आज कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि काही नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनेसाठी राजकारण हे नेहमी निवडणुकांपुरतं मर्यादित असतं. एकदा निवडणुका संपल्या की आम्ही सारे शिवसैनिक आपापल्या विभागातील लोककल्याणाच्या कामांना सुरूवात करतो. पण काही लोक मात्र मुद्दाम अशा कामांमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांचं राजकारण करत राहू दे. पण शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ निवडणुकांपर्यंतच मर्यादित आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“पत्री पुलाच्या कामात अनेक अडथळे आले. पण अखेर आज पुलाचं गर्डर लॉचिंग विनाविघ्न पार पडलं. त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या उन्नतीसाठी इतर लोकोपयोगी कामांचीही लवकरच सुरूवात करेल. समृद्धी महामार्ग किंवा मुंबई-नागपूर एक्स्प्रेस मार्गाचे काम पुढील वर्षापर्यंतच पूर्ण करण्यात येतील”, असे ते म्हणाले. “प्रत्येक महिन्यात आम्ही विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेत असतो. ट्रान्स-हार्बर लिंक, कोस्टल रोड, वरळी-शिवडी यांना जोडणारा मार्ग अशा विविध प्रकल्पांबाबत सरकार कार्यरत आहे. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पत्री पुल ही नववर्षाची भेट असणार आहे”, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.