महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही अशी टीका सातत्याने राज्याची विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जातेय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालिकेमध्येही हे सरकार स्वत:च्या वजनानेच पडेल अशी टीका केली होती. मात्र ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये राज्य सरकार टीकणार नाही अशी सातत्याने टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का?, असा प्रश्न आदित्य यांना एबीपी न्यूजने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली ही चांगली गोष्ट असल्याचं आदित्य यांनी म्हटलं. हे तीन पक्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले आहेत, असंही आदित्य म्हणाले. महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये वाद असल्याचे दावे केले जात असल्यासंदर्भात बोलताना, “तुम्ही ज्याला वाद म्हणत आहात तो मला वाद वाटत नाही. तीन पक्षांचं सरकार आहे तर चर्चा होत राहतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्लेषण करुन काम केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता येते. असं झाल्यास केवळ पाच वर्षे नाही तर पुढेही आम्ही एकत्र राहून सेवा करत राहू,” असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> Coronavirus : तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी केली? लोकल कधी सुरु होणार?; आदित्य ठाकरेंनी दिली उत्तरं

महाराष्ट्र सरकारला अनेक चेहरे (नेतृत्व) असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षाला सध्या काही काम नसल्याने ते हे सर्व उद्योग करत असल्याचा टोला लगावला आहे. विरोधी पक्षला अशा टीकेवर उत्तर देण्याऐवजी आम्ही काम करत राहणं जास्त योग्य ठरेल. मुख्यमंत्री आधी सर्वांचा सल्ला घेतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांविरोधा सुरु असणाऱ्या चौकशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सध्या तपास सुरु असल्याने काही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. प्रकरण न्यायाप्रविष्ठ असल्याने काही भाष्य करणं अयोग्य ठरेल, असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> केंद्राकडून महाराष्ट्राला २६ हजार ९५९ कोटी येणे बाकी; उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर मांडला हिशोब

मान्सून तयारीसंदर्भातही दिली माहिती…

या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा आम्हाला मिळाला असल्याचं आदित्य यांनी सांगितलं. यासंदर्भात प्रशासन तयारी करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. २०-२५ वर्षापूर्वी पाऊस पडायचा तेव्हा अनेक ठिकाणी दोन तीन दिवस पाणी साठून रहायचं. मात्र आता भरती असल्यावरच पाणी साठून राहण्याची समस्या निर्माण होते. यंदा आणखीन दोन पंपिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असून यापूर्वी पाच स्टेशन्स कार्यरत असल्याचं आदित्य म्हणाले. एका तासामध्ये १२० मीलीमीटर पाऊस पडल्यास कोणत्याही शहरामधील व्यवस्था कोलमडून पडेल. तरीही आम्ही प्रयत्न करत आहोत की यंदा मुंबईमध्ये पाणी साचणार नाही, असं आदित्य म्हणाले.