News Flash

मातृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अनाठायी- विद्या बाळ

पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीला साधे माणूस म्हणूनही वागवले नाही, त्यामुळे स्त्रियांचे उदात्तीकरण करण्याच्या कल्पनांचा पुनर्वचिार करण्याची गरज आहे. मातृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अनाठायी असल्याचे प्रतिपादन स्त्री

| April 3, 2014 01:20 am

पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीला साधे माणूस म्हणूनही वागवले नाही, त्यामुळे स्त्रियांचे उदात्तीकरण करण्याच्या कल्पनांचा पुनर्वचिार करण्याची गरज आहे. मातृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अनाठायी असल्याचे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक, ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संपादिका विद्या बाळ यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात कवी इंद्रजित भालेराव यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई भालेराव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘आई तुझ्यामुळे मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. व्यासपीठावर डॉ. संध्या दुधगावकर, महंत खेडकर बाबा, वत्सलाबाई भोंग, चित्रकार नयन बारहाते, गया भालेराव आदी उपस्थित होते. पुस्तकात इंद्रजित भालेराव यांच्या आईविषयी मान्यवरांच्या आठवणी, छायाचित्रे यांचा समावेश आहे. पुस्तकाचे प्रकाशन बाळ यांच्या हस्ते झाले. त्या म्हणाल्या, की अजूनही आपली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रीला माणूस म्हणून समजून घेत नाही. एकीकडे स्त्रीचा गौरव करायचा आणि दुसरीकडे तिला ‘पायाची वहाण’ अशा दर्जाची वागणूक द्यायची, असा प्रकार आजही समाजात आढळून येतो. मूल न होणे या प्रकारात पुरुषापेक्षा स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. त्याचबरोबर बलात्कारासारख्या अमानुष घटनांमध्ये स्त्रीलाच यातना सहन कराव्या लागतात, पुरुष नामानिराळे राहतात. अशा वेळी स्त्रीला माणूस म्हणून समजून घेणे, समतेची वागणूक देणे महत्त्वाचे आहे, असे सांगून बाळ यांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे उदाहरण दिले. स्त्रीच्या कर्तृत्वाला विकसित होण्यासाठी तिनेच पुढे आले पाहिजे. पुरुषी मानदंड झुगारून स्त्रीने आपली स्वत:ची वाट निर्माण केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. कृतज्ञता हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून या पुस्तकाच्या निमित्ताने भालेराव यांनी आपल्या आईविषयीचीच कृतज्ञता व्यक्त केली आहे, असे त्यांनी सांगितले.
महंत खेडकर बाबा, भालेराव यांनी रुक्मिणीबाई भालेराव यांच्या आठवणी जागवल्या. चित्रकार नयन बारहाते यांनी पुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेच्या अनुषंगाने आपले अनुभव सांगितले. हे पुस्तक साकारताना खूप तन्मयतेने काम केले, असे सांगून बारहाते यांनी पुस्तकातील रेखाटने, मुखपृष्ठ, मजकुराची मांडणी यासंबंधी विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. दुधगावकर यांनी समाजात स्त्री-पुरुष समानतेची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अरुण चव्हाळ यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. भावना दुधगावकर यांनी केले. शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2014 1:20 am

Web Title: aai tuzya mule mee book published hand of vidya bal
टॅग : Parbhani
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीचे हिंगोलीत मनोमिलन
2 जैन मंदिरात चोरलेल्या सोन्याच्या पादुका जप्त
3 महायुतीच्या जाधव यांच्याकडून वरपूडकर फॉर्म्युल्याचा अवलंब!
Just Now!
X