बॉलिवूडमधील कलाकारांचं घर किंवा ऑफिस नेहमीच वैविध्यपूर्ण असतं. मिस्टर परफेकशनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने नुकतीच मुंबईत जागा विकत घेतली आहे. डी.एन.एच्या वृत्तानुसार आमिरने व्यावसायिक कामासाठी ही जागा घेतली असून, त्याने प्रति स्वेअर फूट ३७,८५४ रूपये एवढी किंमत मोजली आहे. आमिरने ऑफिससाठी या चार जागा घेतल्या आहेत. त्यातील तीन दुसऱ्या मजल्यावर तर एक तिसऱ्या मजल्यावर आहे. आमिरने स्टॅम्प ड्युटी म्हणून २.१ कोटी रूपये भरले आहेत.

त्याच्या घरापासून ही जागा जवळ असल्याने त्याने ती घेतली असावी. ‘आमिर खान प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाखाली ही जागा घेण्यात आली आहे. आमिरचे सध्याचे ऑफिस ‘खार’ येथे आहे. “आमिर बऱ्याच वर्षांपासून या जागेच्या शोधात होता. त्यामुळे संधी मिळाल्यानंतर त्याने लगेचच ही जागा विकत घेतली.” असं सूत्रांनी सांगितले.

जागेसंबंधीची अधिक माहिती –

ठिकाण – सांताक्रुझ पश्चिम

बिंल्डींग – प्राईम प्लाझा

एकूण जागा – ९,२४६ स्वेअर फूट

सध्या आमिर एक नवीन चित्रपट करतोय.  प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक करणार असल्याची घोषणा आमिर खानने केली होती. ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने हा रिमेक प्रदर्शित होणार आहे. आमिर खान चित्रपटांमधून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करत नाही तर, त्या माध्यमातून कायमच तो प्रेक्षकांना एक संदेश देतो. नकळतपणे प्रेक्षक आमिरच्या प्रत्येक भूमिकेशी जोडले जातात. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत आहेत.