राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून सध्या सर्वच पक्ष आपण आघाडीवर असल्याचा दावा करत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि भाजपामधील नेते किती जागांवर विजय मिळवला यावरुन दावे करत असताना दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

लातूरच्या दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढताना आम आदमी पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट रिट्विट करत थेट मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा”.

भाजपाच एक नंबरचा पक्ष – फडणवीस
“ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

८० टक्के जागा महाविकासआघाडीकडे – थोरात
“ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकं समाधानी आहेत.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच, चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला असल्याचंही थोरात यांनी सांगितलं आहे.