News Flash

‘आप’मध्ये देणग्यांचा निधी लंपास झाल्यावरून मतभेद

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद विविध पातळीवर उमटत असताना राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की

| May 21, 2014 02:07 am

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद विविध पातळीवर उमटत असताना राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की ओढविलेल्या आम आदमी पक्षात नाशिकमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. पक्षाच्या नावे १५ लाखाच्या संकलित झालेल्या निधीवरून पराभूत उमेदवार विजय पांढरे यांच्यावर तोफ डागत ते व्यवहारात दोन नावे वापरून व्यवहार करत असल्याचा आरोप पक्षाचे सचिव मुकुंद बेणी यांनी केला आहे. दुसरीकडे जिल्हा कार्यकारिणीने बेणींनी संकलित केलेल्या निधीचा मागणी करूनही हिशेब दिला नसल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे.
लोकसभेच्या निकालाचे पडसाद अन्य पक्षांप्रमाणे आपमध्ये उमटले आहेत. मतदान झाल्यानंतर आपचे उमेदवार पांढरे हे कार्यकर्त्यांचा विश्वासघात करून नाशिकमधून गायब झाल्याचे बेणी यांनी निवेदनात म्हटले आहे. आपची प्रचार यंत्रणा धनदांडग्यांच्या हाती होती. पक्षाच्या ध्येयधोरणाविरुद्ध देणग्या गोळा करण्यात आल्या. हा काळा पैसा पांढरेंच्या प्रचारासाठी वापरला गेला. आपचे कार्यकर्ते पायपीट करत असताना पांढरे आलिशान मोटारीतून भ्रमंती करत होते, असे टीकास्त्र बेणी यांनी सोडले. स्थानिक, राजकीय व सामाजिक प्रश्नांची कोणतीही माहिती नसताना ते निवडणुकीला सामोरे गेले. दिल्ली ते गल्ली मोफत सभासद नोंदणी पक्षाने जाहीर करूनही केवळ नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी १० रुपये घेऊन २५ हजार पुस्तके खपविण्यात आली. पांढरे यांच्या पाठिंब्याने जिल्हा समन्वयक प्रभाकर वायचळे व खजिनदार सुरेश शिंदे यांनी या पैशांचा आजवर हिशेब दिला नसून, त्यात अपहार झाल्याचा संशय बेणी यांनी व्यक्त केला. विजय बळवंत पांढरे आणि विजय बळीराम पांढरे ही नावे व्यवहारात वापरून एक व्यक्ती आपले सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडत आहे. पांढरेंनी निवडणूक आयोगाला आपल्या बँक खात्यांची माहिती दिली असली, तरी त्यांचे व्यवहार एक हॉटेल व्यावसायिक बघत असल्याचा आरोपही बेणी यांनी केला.
बेणी पांढरेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडत असताना, जिल्हा कार्यकारिणीने आपचे जिल्हा सचिव मुकुंद बेणींची गैरव्यवहार तसेच पक्षाची बदनामी केल्याच्या कारणावरून हकालपट्टी केली आहे. सभासद नोंदणी पुस्तके व जमा झालेल्या निधीचा सातत्याने मागणी करूनही बेणींनी हिशेब दिला नाही, त्यांच्याकडे जमा झालेली देणगी पुस्तके तसेच पैशांचाही हिशेब न देणे, पक्षाकडून आलेल्या निधीच्या खर्चाचा तपशील न देणे आदी कारणांवरून जिल्हा कार्यकारिणीने त्यांच्या हकालपट्टीचा ठराव मंजूर केल्याचे जिल्हा समन्वयक अॅड. प्रभाकर वायचळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.
बेणींनी पक्षाच्या नावाखाली परस्पर निधी जमा करण्याचा प्रयत्न केला, जिल्हा कार्यकारिणीकडे धमकावून पैशांची मागणी केली, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ करणे आदी मुद्दय़ांवर बेणींना नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले नसल्याने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे अॅड. वायचळे व शहर समन्वयक जितेंद्र भावे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 2:07 am

Web Title: aam aadmi party expelled nashik district secretary over misuse of fund
Next Stories
1 रत्नागिरी जिल्ह्य़ात वादळी वारे- विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
2 तरतुदीतील दुजाभावामुळे महापालिकेत गदारोळ
3 पराभूत धस म्हणतात : ‘मुंडेंना मंत्रिपद द्यावे’!
Just Now!
X