राज्यातील दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी आमीर खानने ११ लाखांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राज्यात विशेष: मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी पडत असल्याने दुष्काळाचे संकट निर्माण होत आहे. यंदाही पावसाअभावी राज्यावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले असून त्यावर मात करण्यासाठी दार्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खानने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी राज्यात सुरू असलेल्या या अभियानाची माहिती आमीरला दिली होती. दुष्काळ निवारणात हे अभियान कसे फायदेशीर ठरणार आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आमीरला पटवून दिल्यानंतर आपल्याला या अभियानास काहीतरी मदत करायची आहे असे त्यांने मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांने ही मदत दिली आहे. आमीर खानने केलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्याचे आभारही मानले आहेत.