वीज वितरण कंपनीने वीजचोरीचा ठेवलेला खोटा आरोप ८२ वर्षीय शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण ठरले असल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंत्यासह तीन अभियंत्यांचे करण्यात आलेले निलंबन तातडीने मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी आता विविध संघटनांनी आंदोलन छेडले आहे.
निलंबित अभियंत्याची बाजू घेत सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, क्षेत्रीय कामगार तांत्रिक कामगार संघटना, राज्य मागासवर्ग संघटना, वर्कर्स फेडरेशन, इंटक, युनियन इत्यादी संघटनांनी संयुक्तरित्या येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करून अभियंत्यांच्या निलंबनाविरुद्ध लढण्याचा बिगुल वाजवला. निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि वीज गळती कमी करण्याची कामे केली जाणार नाहीत, असा इशारा देऊन संघटनांनी काळ्याफिती लावून या घटनेचा निषेध केला आहे. बाभूळगाव तालुक्यातील चिमणा-बागापूर येथील ८२ वर्षीय शेतकरी अमरलाल मणिहार यांनी आपल्या शेतात अतिरिक्त वीज वापरून त्याची चोरी केल्याचा ठपका ठेवणाऱ्या वीज वितरणच्या चुकीच्या कारवाईमुळे मणिहार यांना इतका जबर धक्का बसला की, त्यांना इस्पितळात भरती करावे लागले आणि तेथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांच्यासह उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे, सहाय्यक अभियंता संजय कांबळे यांना निलंबित करण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अभियंत्यांच्या निलंबनाविरुद्ध विविध कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले असून निलंबन रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी एप्रिलमध्ये अर्थात, मणियार यांच्या मृत्यूपूर्वी तीन आठवडय़ापूर्वीच पदभार सांभाळला. त्यापूर्वी बाळासाहेब जाधव हे अधीक्षक अभियंता होते. मणियार यांची ‘छळगाथा’ फुलकर रुजू होण्यापूर्वीच सुरू झाली होती, असा संघटनांचा युक्तीवाद आहे. आणखी असे की, ज्या उपकार्यकारी अभियंता झाडे आणि सहाय्यक अभियंता कांबळे यांचे निलंबन ज्यांच्या स्वाक्षरीने झाले ती स्वाक्षरी करणारे कार्यकारी अभियंता पंकज तगडपल्लीवार यांनी अधीक्षक अभियंत्याच्या वतीने स्वाक्षरी करणे नियमबाह्य़ असल्याचेही संघटनांचे मत आहे.

‘..आणि नंतर झाले अंत्यसंस्कार’
वीजचोरीच्या खोटय़ानाटय़ा आरोपांमुळे अन्य शेतकऱ्यांचे बळी जाऊ नये म्हणून आपल्या वडिलांचा मृतदेह घरात पडून असतांनाही आपण प्रथम पत्रकार परिषद घेऊन वडिलांची झालेली छळगाथा सांगत आहोत, असे अमरलाल मणिहार यांचा मुलगा अश्विन मणिहार आणि ग्राहक चळवळीतील कार्यकत्रे राजू निवल व विलास तायडे यांनी पत्रकारांना सोमवारी सांगितले होते. वार्ताहर परिषदेनंतर अमरलाल मणिहार यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विलास तायडे, बापू दर्यापूरकर, अमोल देशमुख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

‘ग्राहकांची लूट करणाऱ्याना बडतर्फ करा’
संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांची लूट करणाऱ्या शेतक ऱ्यांना छळणाऱ्या, शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बचावासाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांचा आम्ही निषेध करतो. निलंबित केलेल्या वीज वितरण कंपनीच्या तीनही अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया ग्राहक चळवळीचे नेते राजू निवल यांनी येथे व्यक्त केली आहे. ८२ वर्षीय प्रामाणिक शेतकरी मणिहार मृत्यू प्रकरणात या तीन अभियंत्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी संघटनेने आपली शक्ती वापरावी, हे दुर्दैव आहे. संघटनशक्तीच्या जोरावर ग्राहकांचा छळ होत असेल तर ग्राहकही आता शांत बसणार नाही. विधायक मार्गाने लढा लढून न्याय पदरी पाडून घेता येतो, हे मणिहार प्रकरणातून सिद्ध झाले आहे. मणिहार प्रकरण हे साऱ्या वीज ग्राहकांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कंपनीचे अधिकारी मात्र कुणालाही जुमानत नाही, हेही या प्रकरणातून दिसून आले आहे. वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, अधिकार नसतानाही शेतकऱ्यांवर कारवाई करणे, त्याच्यावर वीजचोरीचा आरोप लावून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे असे गंभीर कारणांमुळे या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. त्यांची कायमस्वरूपी बडतर्फ व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे निवल म्हणाले.