विविध कारणांमुळे सध्या देशभर गाजत असलेल्या आम आदमी पार्टीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कर्नल (निवृत्त) राजेंद्र गडकरींसारखा अपरिचित उमेदवार दिल्यामुळे कोकणात तरी या निवडणुकीसाठी ‘आप’चा बार फुसका ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आपने उमेदवारांची तिसरी यादी नुकतीच जाहीर केली असून, त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कर्नल गडकरींना उमेदवारी जाहीर झाली आहे. लष्करात असताना एनसीसीच्या कोल्हापूर विभागाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्या काळात कोकणातील या दोन जिल्ह्य़ांशी त्यांचा संपर्क आला होता. त्याव्यतिरिक्त त्यांचा या प्रदेशाशी फारसा संपर्क नाही, तसेच राजकारणाचा गंधही नाही. असे असूनही मुंबईतील ‘आप’चे वजनदार नेते मयांक गांधी यांच्या शिफारशीवरून कर्नलसाहेबांची अचानक वर्णी लागल्याचे समजते.
या निवडणुकीत काँग्रेसकडून विद्यमान खासदार नीलेश राणे आणि भाजपा-सेना युतीकडून शिवसेनेचे सचिव आमदार विनायक राऊत यांची नावे यापूर्वीच जाहीर झाली आहेत.
आपकडून येथील नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेटय़े यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यांचा येथे चांगला जनसंपर्क आहे, पण त्यांच्याऐवजी अचानक गडकरींचे नाव जाहीर झाल्यामुळे कोकणातील समाजवादी साथीही बुचकळ्यात पडले आहेत.
 पण तूर्त तरी त्यांनी सेवा दलाच्या निष्ठावान सैनिकाप्रमाणे कर्नलसाहेबांना रसद पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्यामुळे या मतदारसंघात कागदोपत्री तिरंगी लढत असली तरी प्रत्यक्षात राणे विरुद्ध राऊत असा थेट दुरंगी सामनाच रंगणार आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कर्नल चितळे यांनी आज प्रथमच कोकणात चिपळूण येथे येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली व प्रचाराबाबत चर्चा केली.