News Flash

‘आप’पेक्षा ‘नोटा’च भारी!

मराठवाडय़ातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक आहेत. मराठवाडय़ातील आठ लोकसभा मतदारसंघात ५२ हजार ८७ जणांनी उमेदवार नापसंतीचे ‘नोटा’ स्वीकारले.

| May 19, 2014 01:56 am

मराठवाडय़ातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक आहेत. मराठवाडय़ातील आठ लोकसभा मतदारसंघात ५२ हजार ८७ जणांनी उमेदवार नापसंतीचे ‘नोटा’ स्वीकारले. आम आदमी पार्टीच्या मराठवाडय़ातील आठही उमेदवारांच्या मतांची बेरीज केवळ ४६ हजार ५११ एवढीच होते.
सत्तेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पर्याय म्हणून तर विरोधी सेना-भाजपातील उमेदवारांपेक्षा सरस आणि चारित्र्यवान कार्यकर्ते आमच्याच पक्षात असल्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या मराठवाडय़ातील उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्यांची ‘फॅशन’ निर्माण करणारे आम आदमी पार्टीला मते मिळविता आली नाही. मराठवाडय़ात औरंगाबादचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी सर्वाधिक ११ हजार ९७४ मते मिळविली.
खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांच्यापेक्षा सुशिक्षित मतदार आम आदमी पार्टीच्या मागे आहेत, असा दावा अंजली दमानिया करीत होत्या. लोकसभा निवडणुकांपूर्वी समाजवादी जन परिषद हा पक्षच विसर्जित करून त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. सच्चा कार्यकर्ता लोमटे यांची ओळख आहे. तरीदेखील मत मिळविण्यात मात्र त्यांना सपेशल अपयश आले. केवळ सुभाष लोमटे नाही तर मराठवाडय़ातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना मतदारांनी ‘मोजले’देखील नाही. न्यू जर्सीहून आलेल्या जालन्यातील दिलीप म्हस्के यांना ४ हजार ६२२ मते मिळाली. परभणीच्या सलमा कुलकर्णी यांना ४ हजार ४४९ मते मिळाली. येथे ‘नोटा’ची मते १७ हजार ५०२ आहेत. उस्मानाबादचे विक्रम साळवे यांना ४ हजार २४० मते मिळाली. उस्मानाबाद मतदारसंघात तर ‘नोटा’ची मते आम आदमी पार्टीच्या उमेदवारापेक्षा अधिक आहे. अशीच स्थिती लातूरची आहे. लातूरचे आम आदमी पार्टीचे उमेदवार दीपरत्न निलंगेकर यांना ९ हजार ८२९ मते मिळाली. तर उमेदवार योग्य नाही या प्रवर्गातील ‘नोटा’ला १३ हजार ९९६ मतदारांनी पसंती दिली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात नंदू माधव यांनी उमेदवारी मिळविली. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘शिवाजी- द अंडरग्राउंड’ यासारख्या कलाकृतींमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या नंदू माधव यांनाही मतदारांनी नाकारले. नांदेडमधील आम आदमी पार्टीचे नरेंद्रसिंग ग्रंथी यांना ३ हजार ३९७ मते मिळाली. ‘सत्शील चारित्र्य’ असा निकष निवडणुकीत लागतो, असा दावा करत उमेदवार निवडीची प्रक्रिया कशी पारदर्शक आहे, हे सांगणाऱ्या आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मिळविलेली मते एकूण मतांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:56 am

Web Title: aap nota votes more
टॅग : Aurangabad
Next Stories
1 शेतकऱ्यांनी ज्ञान, विज्ञान व व्यापार त्रिसूत्री अवलंबावी -डॉ. पाटील
2 राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरळीत
3 अपक्षांच्या खात्यात १ लाख ३७ हजार मते
Just Now!
X