केंद्र व राज्य पातळीवर आम आदमी पार्टीचा बोलबाला असतांनाच आता ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाची उपस्थिती लावण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
जिल्ह्य़ात मार्च महिन्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने आपच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत प्रथमच संघटनात्मक स्वरूप पक्षाला देण्यात आले. जिल्हा संयोजक म्हणून पंकज सायंकार हा नवा चेहरा निवडण्यात आला. सचिव- प्रमोद भोयर, कोषाध्यक्ष- प्रमोद भोसले, सहसंयोजक- मनीषा पारधेकर यांची प्रामुख्याने नियुक्ती झाली. यावेळी आपचे केंद्रीय निरीक्षक प्रत्युक्ष श्रीवास्तव (दिल्ली) हे प्रामुख्याने हजर होते. जिल्हा प्रभारी प्रद्युन्म सहस्त्रभोजने (नागपूर) यांच्या सूचनेने जिल्हा कार्यकारिणीवर आठही तालुक्यातून प्रत्येकी तीन सदस्य घेण्यात आले. या बैठकीतून आपच्या कार्यपध्दतीविषयी सर्वाना अवगत करण्यात आले. बैठकीत विविध विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले, तसेच वर्धा शहरात झाडू अभियान सुरू करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्य़ातील ज्वलंत समस्यांवर लोकांच्या सहभागाने आंदोलन सुरू करण्याची सूचना निरीक्षकांनी केली. सदस्य नोंदणीस चालना देण्याची भूमिका मांडण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाल्याचे प्रमोद भोसले यांनी सांगितले.