महाराष्ट्राची दीर्घकाळापासूनची परंपरा असलेल्या पायी आषाढी वारीला परवानगी मिळावी यासाठी विरोधकांसह अनेक वारकरी संघटनांकडूनही मागणी केली जात आहे. यासाठी राज्याच्या विविध भागात या विऱोधात आंदोलनं सुरु आहेत. सरकारने आषाढी वारीसाठी निर्बंध घालून दिले असले तरी पायी वारीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या राज्यातल्या वारकरी संघटनांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे.

नागपुरातही पायी वारीला परवानगी मिळावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेसह शहरातल्या अनेक वारकरी संघटनांनी भजन आंदोलन केलं आहे. महाराष्ट्राची शेकडो वर्षांपासूनची परंपरा असलेली आषाढी वारी सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याच्या निषेधार्थ आणि राज्यातली मठमंदिरे उघडण्याच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वारकरी एकत्र जमून भजनं गात आंदोलन करत आहेत.

हेही वाचा- ‘आषाढी’साठी नियमावली जाहीर ; देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी!

यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.