बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीकाटिप्पणी तर केलीच मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांना शेलक्या शब्दांत टोलाही लगावला आहे.

आपल्या पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, “बेळगावचे नेते, जनता आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या प्रकरणात शिवसेनेचे संजय राऊत अगोदर खरं बोलले असं मी म्हणेन. ते म्हणाले होते की बेळगावात भगवा फडकेल. खरा भगवा भाजपाकडेच आहे हे आता स्पष्ट झालंय. एवढीच प्रतिक्रिया देईन”.

हेही वाचा – “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

सामन्यातल्या अग्रलेखात हिंदुत्वाविषयी केलेल्या भाष्याबद्दल विचारलं असता शेलार म्हणाले, “मी आत्ताच म्हणालो की संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागले असतील. पण कधीकधी आपल्या मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात. आणि त्या यूटर्नमध्ये शिवसेना आता हिंदुत्वापासून सरकली हे लपवण्याचा अतिशय काटोकाट प्रयत्न संजयराऊत करत आहेत. टिपू सुलतान जयंतीपासून बेहराम पाड्यात जिंकण्यापर्यंत, गोविंदांवर केसेस टाकण्यापासून गणेशोत्सव आणि मंदिरांच्या बंदीपर्यंत जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अपेक्षित आहे तेच शिवसेना करत आहे. आणि म्हणून आपल्या मनगटातून आणि हातातून भगवा सरकला हे जाणवल्यावर अजून आम्ही आहोत हे दाखवण्याचा त्यांचा वायफळ प्रयत्न आहे”.

आणखी वाचा – Belgaum Election Result : बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता; महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे. यावरुनच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना टोला लगावला.