News Flash

BLOG : सरकारी नोकरीतील आरक्षणासाठी आट्यापाट्या खेळाडूंचा आटापिटा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित हा फुटबालप्रेमी असला तरी परवा त्याला महाराष्ट्राच्या मातीतले ‘देशी’ खेळाडू भेटायला आले होते

BLOG : सरकारी नोकरीतील आरक्षणासाठी आट्यापाट्या खेळाडूंचा आटापिटा!

– कीर्तिकुमार शिंदे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित हा फुटबालप्रेमी असला तरी परवा त्याला महाराष्ट्राच्या मातीतले ‘देशी’ खेळाडू भेटायला आले होते. मनसेच्या दादर येथील राजगड मुख्यालयात ठाणे, रायगडपासून पार विदर्भातल्या चंद्रपूरपर्यंतच्या जिल्ह्यांतून तीनशेहून अधिक खेळाडूंनी अमितची भेट घेतली. त्याला कारणही तसंच होतं. हे सर्व खेळाडू आट्यापाट्या हा देशी खेळ खेळणारे होते. राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे सरकार दरबारी या देशी खेळाला मान, आणि तो खेळणा-या खेळाडूंना न्याय मिळेल अशी त्यांची भावना होती.

क्रिकेट आणि आता फुटबालमागे वेड्या झालेल्या मुंबईसारख्या शहरातल्या फार कमी तरुणांना माहिती असेल की, आट्यापाट्या नावाचा एक खेळ आहे. हुतूतू, खो-खो यांसारखे काही देशी खेळ मुंबईत आजही मोठ्या प्रमाणात खेळले जात असले तरी आट्यापाट्या खेळताना आता मुंबईत सहसा कुणी दिसत नाही. असं असलं तरी मुंबईजवळच्याच ठाणे, कल्याणमध्ये मात्र आट्यापाट्या खेळणारे अनेक संघ आहेत आणि त्यांच्यात नियमित स्पर्धाही होत असतात. देशातील तब्बल २२ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. गंमत अशी की, प्रत्येक राज्याच्या खेळाडूंना वाटतं की, हा आपल्याच राज्यात, आपल्याच भूमीत जन्माला आलेला क्रीडाप्रकार आहे. महाराष्ट्रीय खेळाडूंचाही तसाच काहीसा समज आहे. त्या समजाला अगदी प्राचीन इतिहासाचा नसला तरी शिवरायकाळातील इतिहासाचा निश्चितच आधार आहे. डा. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोषात या खेळाचं वर्णन करताना “मराठयांचा गनिमी कावा या (आट्यापाट्या) खेळांत अंतर्भूत झालेला आहे. या खेळात महाराष्ट्रीयांचा नेहमींचा साधेपणा व अडदांडपणा भरलेला आहे” अशी नोंद केलेली आहे. डा. केतकरांनी गनिमी कावा आणि आट्यापाट्या यांच्या संदर्भात ही एकच ओळ लिहून ठेवली असली तरी त्यामुळे या खेळाचं एक वेगळंच ऐतिहासिक महत्व अधोरेखित होतं. “तुकारामाच्या अभंगांत (आट्यापाट्या खेळातील) मृंदग पाटीचा उल्लेख सापडतो” असंही डा. केतकरांनी लिहून ठेवलंय. राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोषातही “आट्यापाट्या हा महाराष्ट्रीय खेळ असून संत तुकारामाच्या काळी हा खेळ प्रचलित होता, असे त्याच्या अभंगातील वर्णनावरून दिसते”, असे नमूद करण्यात आले आहे. या उल्लेखांमुळे आट्यापाट्या हा खेळ मराठी मातीतला अत्यंत जुना खेळ आहे, असं साधार मानायला हरकत नसावी.

इतिहास आट्यापाट्यांच्या स्पर्धांचा

आट्यापाट्या या खेळाच्या स्पर्धा पहिल्यांदा आयोजित करण्यात आल्या त्या स्वातंत्र्यपूर्वकाळात, म्हणजे ब्रिटिशकाळात आणि त्या स्पर्धा आयोजित करण्याचा मान पुण्यातील डेक्कन जिमखान्याला जातो. डेक्कन जिमखान्यानेच या खेळाची आधुनिक नियमावली बनवली. त्यानंतर शालेय स्तरावर क्रिकेटप्रमाणे आट्यापाट्यांच्याही शिल्ड स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यातूनच या खेळात काही महत्वाच्या सुधारणाही झाल्या. डा. केतकरांच्या महाराष्ट्रीय शब्दकोषात यासंबंधी माहिती देताना “शिक्षण संस्थांच्या चुरशी सुरू झाल्यापासून खेळास व्यवस्थित स्वरूप आलें आहे व फेरबदलहि झाले आहेत. “उदहारणार्थ, खेळणाऱ्यांपौकीं एखादा भिडू मेला तर डाव संपत असे. पुढें तीन गडी मरेपर्यंत खेळणाऱ्या पक्षाचें आयुष्य वाढविण्याचा प्रकार ‘पूना स्कूल्स अथलेटिक असोसिएशननें पाडला. डेक्कन जिमखान्यानें गडी मरण्यावर खेळाचा शेवट अवलंबून न ठेवतां खेळाला कालमर्यादा घातली आणि प्रत्येक दोषाबद्दल किती गुण कापावें हें ठरविलें.” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्य़ानंतरच्या काळात या खेळाचा प्रसार करण्यासाठी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने प्रयत्न केले. या मंडळाने विभागीय स्तरावर आट्यापाट्या सामन्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या. पुढे १९८२मध्ये आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्याच वर्षी पहिली राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धा झाली. फेडरेशनच्या नव्या नियमावलीमुळे पूर्वी हा खेळ खेळतांना जो गोंगाट होत असे तो कमी झाला!… तर असा हा देशी खेळ आज अचानक चर्चेच येण्याचं कारण काय?

देशी खेळ असूनही प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीला आता चांगलीच प्रतिष्ठा लाभली आहे. अशी प्रतिष्ठा आट्यापाट्याच्या वाट्याला अद्याप जरी आली असली नसली तरी आज देशातील तब्बल २२ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातोय, हा चमत्कारच म्हणायला हवा. या खेळासाठी कोणतीही विशेष साधनसामुग्री लागत नसूनही भरपूर मनोरंजन करणारा आणि व्यायाम घडवणारा हा खेळ असल्यामुळे असेल कदाचित, पण आट्यापाट्या आजही मोठ्या प्रमाणात खेळला जातोय. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर या खेळाच्या नियमित स्पर्धा होत असतात. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या देशी खेळांच्या अधिकृत यादीत आट्यापाट्याचा समावेश होता. विविध खेळ खेळणा-या गुणवत्तापूर्ण खेळाडूंसाठी सरकारी नोकरीत एकूण मिळून पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे. ३० एप्रिल २००५च्या शासन निर्णय क्र. राज्य क्रीडा धोरण २००२/ प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२ मध्ये, आट्यापाट्या या खेळाला देशी खेळांच्या यादीत नमूद करून माध्यमिक, उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात क्रीडा सवलतीचे २५ गुण वाढीव देण्याची व शासकीय आस्थापनांमध्ये नोकरीकरीता ५ टक्के आरक्षणाची तरतूद लागू होती. या क्रीडा धोरणानुसार, आलिम्पिक क्रीडा स्पर्धा , एशियन गेम्स आणि कामनवेल्थ गेम्स या स्पर्धांमध्ये समावेश असलेले सर्व खेळ तसंच कबड्डी, खो-खो आणि आट्यापाट्या या देशी खेळांतील स्पर्धात पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळविणा-या, म्हणजे सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक जिंकणा-या खेळाडूंचाच सरकारी नोकरीसाठी विचार केला जात असे. या क्रीडा धोरणामुळे राज्य, देश आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही (भारत, भूतान आणि बांगलादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धा आयोजित केल्या जातात) आट्यापाट्या खेळलेल्या काही खेळाडूंना सरकारी नोकरी मिळाली. सारंकाही सुरळीत चाललं होतं. मात्र, उठताबसता शिवरायांचं नाव घेऊन राज्यकारभार करणा-या भाजप-शिवसेना युती सरकारने १ जुलै २०१६पासून देशी खेळांच्या यादीतून आट्यापाट्याला अचानक वगळण्यात आलं. १ जुलै २०१६च्या शासन निर्णय क्र. राज्य क्रीडा धोरण २००२/ प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२ मध्ये देशी खेळांच्या यादीत आट्यापाट्या या क्रीडा प्रकाराचा उल्लेखच करण्यात आला नाही. यामुळे आट्यापाट्या खेळणा-या खेळाडूंना सरकारी नोकरीचा मार्गच बंद झाला.

आट्यापाट्या खेळाडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची भेट घेतली.

सरकारी निर्णयाचा निषेध

सरकारच्या या निर्णयाविरोधात रायगड, वाशीम, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर इथल्या अनेक आट्यापाट्या खेळाडूंनी आपल्या आपल्या स्थानिक पातळीवर, जिल्हाधिका-यांकडे याबाबत आपला निषेध नोंदवला. आट्यापाट्या फेडरेशन आफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ या संघटनांचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवरील आट्यापाट्या खेळाडूंनी अनेकांशी पत्रव्यवहार केला. पण त्यांच्या मागणीची साधी दखलही राज्य सरकारच्या पातळीवर कुणीही, विशेषत: क्रीडा मंत्र्यांनी घेतली नाही. अखेर आपला आवाज बहि-या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या खेळाडूंनी अमित ठाकरेंनाच साकडे घातले. “आजही महाराष्ट्रात हजारो खेळाडू हा खेळ खेळत आहेत. आट्यापाट्या खेळणा-या वीसहून अधिक खेळाडूंना राज्य सरकारचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. असं असतानाही सरकार या खेळाला सापत्न वागणूक देत आहे. आता मनसेनेच आमचा आवाज बनावं” अशी अपेक्षा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सागर गुल्हाने यांनी अमित ठाकरेंशी बोलताना व्यक्त केली.

“मनसे आट्यापाट्या खेळाडूंना वा-यावर सोडणार नाही. राज्य सरकारच्या देशी खेळांच्या अधिकृत यादीत आट्यापाट्याचा समावेश होऊन खेळाडूंना पुन्हा एकदा सरकारी नोकरीचा दरवाजा खुला व्हावा यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असं आश्वासन अमित राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यास आलेल्या खेळाडूंना दिलं आहे. मात्र ही आश्वासनपूर्ती होईपर्यंत सरकारी नोकरीसाठीचा या खेळाडूंचा आटापिटा सुरूच राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 2:05 pm

Web Title: aatyapatya players demand reservation in government jobs
Next Stories
1 यो-यो फिटनेस टेस्ट नापास झाल्यामुळे संजू सॅमसन भारत अ संघातून बाहेर, सुत्रांची माहिती
2 स्कॉटलंडने रचला इतिहास, वनडेतील नंबर एक संघाला पराभवाचा धक्का
3 नेहमी माझ्यावर अन्याय का होतो?? महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची उद्विग्न प्रतिक्रीया
Just Now!
X