राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज, शनिवारी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘सत्तारांनी राजीनामा का दिला अद्याप समजले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही, हे फक्त मुख्यमंत्री किंवा राजभवनाची सुत्रे सांगतील. पण ते नाराज का आहेत माहित नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री करून सन्मान केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यात जास्त मंत्रिपदे आलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना अॅडजेस्ट करावे लागते.’ तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी विलंब होत असल्याचं चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.

बाहेरून शिवसेनेत आलेल्यांना अॅडजेस्ट व्हायला वेळ लागेल. जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत, असा खोचक टोला राऊत यांनी नाराजांना लगावला आहे. राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून सत्तारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तर यांच्यासोबत बैठक सुरू आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नसल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

सत्तारांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. मुनगुंटीवर, चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. महाविकासआघाडीचं लक्ष फक्त खुर्चीवर असून खातेवाटपावरून महाविकासआघाडीत भांडण लागली आहेत, असा आरोप मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडीवर केला आहे. आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील असं वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं.

सत्तारांचा राजीनामा हा महाविकास आघाडीला लागलेला मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच सत्तार यांनी राजीनामा दिल्यामुळे खातेवाटपाला आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसंच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचं दिसून येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.