News Flash

अभिनवच्या हस्ताक्षर वर्गाचा समारोप

वार्ताहर, सावंतवाडी

धकाधकीच्या युगात मुलांकडे लक्ष देण्यास आई-वडिलांना पुरेसा वेळ नाही. पूर्वीसारखे व्यक्तिश: प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य होतेच असे नाही. त्यामुळे खरेच कोण चुकतेय याचा शोध घेण्यासाठी पालक, शिक्षक उद्बोधन वर्गाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक तथा हस्ताक्षर वर्गाचे मार्गदर्शक शंकर प्रभू यांनी केले.

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व अभिनव ग्रंथालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हस्ताक्षर सुधार वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, रिझव्‍‌र्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दिनेश पांगम, कोकण रेल्वेचे स्टेशन मास्टर दिनेश चव्हाण, अभिनव फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार तुळसुलकर उपस्थित होते.

प्रभू म्हणाले, ‘मुले अशी का वागतात’ याचा शोध घेण्याची गरज आहे. ३९ वर्षे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याने याचा थोडा अभ्यास केल्यावर अनेक गोष्टी जाणवल्या. काळानुरूप बदलते संदर्भ, बदलत्या सवयी, याचे परिणाम मुलांवर होत असतात. त्यामुळे खरेच कोण चुकतेय शिक्षक, पालक की मुले, अशा स्वरूपाचा संवाद झाला पाहिजे.

चव्हाण म्हणाले, ‘हस्ताक्षर सुधार वर्गातून मुलांच्या अक्षरात बराच फरक पडला. असे वर्ग सातत्याने शनिवार, रविवार व्हावेत.’

लोंढे म्हणाले, ‘संगणकाच्या युगातही हस्ताक्षराचे महत्त्व कायम आहे. सुंदर हस्ताक्षराचे संस्कार आज पूर्वीप्रमाणे होत नाहीत, ते घडविण्याचा अभिनवचा उपक्रम स्तुत्य आहे.’

पांगम म्हणाले, ‘उत्तमोत्तम वाचन आणि लिखाण मुलांना समृद्ध बनवते. अभिनवच्या या उपक्रमातून सुसंस्कारित पिढी घडण्यास मदत होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. मुलांमधून बाळकृष्ण एकनाथ बिले (कळसुलकर हायस्कूल) व मुलींमधून शिवानी विठ्ठल दळवी (मिलाग्रीस)यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कार्यक्रमास अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, ग्रंथपाल गीतांजली ठाकूर व पालक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:44 am

Web Title: abhinav foundation in sindhudurg
टॅग : Sindhudurg
Next Stories
1 चिपळूण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांविरूध्द अविश्वास ठराव?
2 लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे ‘यूजीसी’चे निर्देश
3 विदर्भातील अनेक भागात वादळी पावसाची हजेरी
Just Now!
X