महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे मनसुबे उधळले. केवळ मनसेमुळेच शिवसेनेचे सत्तेचे स्वप्न भंगले. मनसेच्या चार नगरसवेकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच महापौरपदी राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर विजयी झाले. शिवसेनेचे सचिन जाधव यांचा त्यांनी तीन मतांनी पराभव केला.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्यामुळे शहरात पुढच्या वर्षभरासाठी नव्याने महापौरपदाची निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे कळमकर व शिवसेनेचे जाधव यांच्यात ही सरळ लढत झाली. राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, मात्र शिवसेनेनेही या वेळी ही सत्ता जिंकण्याचा चंग बांधला होता. भाजपला बरोबर ठेवत आणखी एका अपक्षालाही शिवसेनेने गळाला लावले. राष्ट्रवादीचा एक व काँग्रेसचे दोन असे तीन नगरसेवक आपल्या बाजूने घेत त्यांना गैरहजर ठेवले. सत्ताधारी तीन नगरसेवकांची अपात्रताही झाली. मात्र सहाने संख्याबळ कमी होऊनही राष्ट्रवादीने ३२ मते मिळवत बाजी मारली ती मनसेमुळेच.
मनपात मनसे सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीबरोबरच आहे. मात्र या चार नगरसेवकांना फोडण्याचा चंग बांधला होता. थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यापर्यंत संपर्क साधून मनसेचा पक्षादेश आपल्या बाजूने मिळवण्यातही शिवसेनेला यश आले. मनसेने वरिष्ठ पातळीवरूनच व्हीप बजावत शिवसेनेचे उमेदवार जाधव यांना मतदान करण्याचा आदेश दिला होता. मात्र, तोपर्यंत मनसेचे नगरसवेक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते. तरीही या पक्षादेशामुळे मनसे आपल्या बाजूने येईल, असा विश्वास शिवसेनेला वाटत होता. तो फोल ठरला. मनसेच्या चारही नगरसेवकांनी पक्षादेशच झुगारून राष्ट्रवादीलाच साथ दिली. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक मतदानापासून दूर झाल्यानंतरही त्यांना मनसेच्या पाठिंब्यामुळेच तीन मतांची आघाडी घेता आली. अन्यथा शिवसेनेचे सत्तेचे स्वप्न साकार झाले असते. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार कळमकर यांना ३२ आणि शिवसेनेचे उमेदवार जाधव यांना २९ मते मिळाली. मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर हेच संख्याबळ उलटे म्हणजे ३३ विरुद्ध २८ झाले असते. तसे होऊ न देता मनसेने राष्ट्रवादीलाच साथ देत मनपातील सत्तेच्या चाव्या आपल्याकडे आहेत, हे दाखवून दिले.