03 December 2020

News Flash

आदिवासी धावपटू प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला!

लंडन ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पिअरसन याचे प्रशिक्षक श्ॉरॉन हन्नान यांचे मार्गदर्शन शहापूर तालुक्यातील एका १० वर्षीय आदिवासी विद्यार्थ्यांला लाभणार असून, येत्या रविवारी (२८

| April 27, 2013 04:02 am

लंडन ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पिअरसन याचे प्रशिक्षक श्ॉरॉन हन्नान यांचे मार्गदर्शन शहापूर तालुक्यातील एका १० वर्षीय आदिवासी विद्यार्थ्यांला लाभणार असून, येत्या रविवारी (२८ एप्रिल) नीलेश मंगेश बात्रे हा प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार असल्याने सर्व थरातून त्याचे कौतुक होत आहे. नीलेशसह अन्य पाच धावपटूंची या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. घरात अठराविश्व दारिद्रय़, खायला पुरेसे अन्न नाही, अंगावर कपडे यथातथाच, वडील एका दगडखाणीत दगडफोडय़ाचे काम करणारे, तर आई मोलमजुरी करून आपली गुजराण करणारी! अशा बिकट परिस्थितीत स्वत:च्या जिद्दीवर धावण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नीलेशची निवड या प्रशिक्षणासाठी झाली आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य परिसरातील पेंढरी येथे राहणारे मंगेश व रंजना बात्रे हे उभयता पोटाची खळगी भरण्यासाठी कामानिमित्त धसई येथे आल्यानंतर त्यांचा मुलगा नीलेशचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चवथ्या इयत्तेत नाव दाखल करण्यात आले. धसई शाळेतील मुला-मुलींची खो-खोची प्रॅक्टिस घेत असताना नीलेश नेहमी तल्लीनतेने खेळाकडे लक्ष देत असे. त्याची उत्सुकता बघून त्याच शाळेतील शिक्षक प्रवीण विशे यांनी नीलेशला खेळामध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर नीलेश क्रीडास्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत प्रथम केंद्रस्तर त्यानंतर तालुकास्तर व जिल्हा स्तरावर ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम आला.
सन २०११-१२ मध्ये ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे ठाणे, नवी मुंबई व रायगड विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांमध्ये अव्वल गुण मिळवून पहिला आलेला नीलेश राज्यस्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांसाठी पात्र ठरला. छत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे येथे तीन दिवस क्रीडा नैपुण्य चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर धसई जिल्हा परिषदेच्या शाळेतून थेट ठाण्याच्या एम. एच. विद्यालयात पाचवीमध्ये नीलेशला प्रवेश देण्यात आला, तर त्याची राहण्याची, खाण्याची व प्रशिक्षणाची व्यवस्था दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे करण्यात आली.
देशातील सर्वाधिक वेगवान धावपटू शोधण्याच्या उद्देशाने स्पीडस्टारच्या वतीने मुंबईमध्ये टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील ८०० पेक्षा अधिक शाळा व १० हजाराहून अधिक मुले सहभागी झाली होती. त्यामध्ये १२, १४ व १६ वयोगटातील ७६ मुले १०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत सहभागी झाली होती. भारताची वेगवान धावपटू पी. टी. उषा यांच्या उपस्थितीत सहा धावपटूंची निवड करण्यात आली. या सहा धावपटूंमध्ये १२ वर्षांखालील वयोगटात नीलेशचा समावेश झाला आहे. नीलेशच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे तो ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीमध्ये आठवडाभर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रतिनिधित्व करणार असून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या पिअरसनचे प्रशिक्षक श्ॉरॉन हन्नान मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 4:02 am

Web Title: aboriginal running player for australia for training
Next Stories
1 रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांना अटक
2 आसोदा यात्रेत गोळीबार करणाऱ्या निलंबित पोलिसाला अटक
3 वादळी पावसाचे राज्यात ८ बळी
Just Now!
X