शाळा-महाविद्यालय गाठण्यासाठी आर्थिक भुर्दंड

डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी वसतिगृहांमध्ये प्रवेशापासून वंचित राहिलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रातही प्रवेश मिळालेला नाही. वसतिगृह न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालय गाठण्यासाठी अधिक प्रवासखर्च येत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत यासाठी डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

डहाणू तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी डी. एड्., बी. एड्., अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. गरीब घरातील या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे त्यांचे प्रवेश रखडल्याने ५००हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. या शैक्षणिक वर्षांचे जून ते नोव्हेंबर असे पहिले सत्र संपून दुसरे सत्र सुरू झाले असून अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून दूर आहेत.

आदिवासी विकास विभागाने डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यांतील आदिवासीबहुल क्षेत्रांत १७ निवासी वसतिगृहे तसेच ३५ आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. १९९५मध्ये विविध निकषांवर आदिवासी वसतिगृहे सुरू करण्यात आली. मात्र आज २० वर्षांनंतरही वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची क्षमता २० वर्षांपूर्वीचीच आहे. वसतिगृहाची क्षमता ७५ ठेवण्यात आली आहे, तसेच वसतिगृहही वाढवलेले नाही. आज शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. परंतु वसतिगृहांची क्षमता कमी असल्यामुळे प्रवेश मिळत नसल्याने अनेक दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी वंचित राहत आहेत. आदिवासी विकास विभागाने याची गंभीर दखल घेऊन आदिवासी वसतिगृहांची क्षमता व संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश देण्यात यावेत यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे हा शासनस्तरावरील निर्णय आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सर्व आदिवासी विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असून प्रकल्प अधिकाऱ्यांनी वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. लवकर प्रवेश दिला नाही तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. – रामदास हरवटे, पालघर जिल्हा युवाअध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद

पालघरमधील दांडेकर महाविद्यालयात सध्या शिकत आहे. दररोज घरून महाविद्यालयात येण्या-जाण्याचा खर्च पूर्ण करू शकत नाही. माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे. मला शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतिगृहात लवकरात लवकर प्रवेश द्यावा. – धीरज तर, विद्यार्थी