मानसिक संतुलन हरवलेल्या एका आदिवासी महिलेने दोन मुलींसह प्रवरा नदीत उडी घेऊन तिघींची जीवनयात्रा संपवली. अकोले तालुक्यातील रंधा येथे ही घटना घडली.
राजूर पोलिसांनी सांगितले की, रंधा बुद्रुक येथील महिला सुनीता काळू मराडे (वय २४) ही दोन दिवसांपासून संध्या (४ वर्षे) व निकिता (२ वर्षे) या दोन छोटय़ा मुलींसह बेपत्ता होती. या तिघींचे मृतदेह आज सकाळी रंधा धबधब्याजवळील वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ नदीपात्रात सापडले.
 सुनीता हिला दोन मुलींच्या पाठीवर अलीकडेच तिसरी मुलगी झाली, मात्र ती मयत झाली. या मुलीचे निधन ती सहन करू शकली नाही. या दु:खानेच ती मानसिक संतुलन हरवून बसली होती. दोन दिवसांपूर्वी दोन मुलींसह घरातून बेपत्ता झाल्यानंतर काल (शुक्रवार) तिने आत्महत्या केली. दोन्ही मुलींना तिने एका ओढणीने स्वत:च्या पोटाला बांधून प्रवरा नदीत उडी घेतली. येथीलच रहिवासी पोपट मराडे यांना आज सकाळी रंधा धबधब्याजवळ या मायलेकींचे मृतदेह नदीपात्रात तरंगताना दिसले.
त्यांनी तातडीने राजूर पोलिसांना त्याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पगार, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
 राजूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयात तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. पुढील तपास हवालदार एल. व्ही. काकड करीत आहेत.