धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याचे पडसाद रविवारी परभणीत उमटले. आदिवासी समाजातील युवकांनी येथील राष्ट्रवादी भवनावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दगडफेक केली. यावेळी पवारांचा पुतळा जाळण्यात आला.
रविवारी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवनावर आदिवासी युवकांचा मोठा जमाव चालून आला. या जमावाने ५.३०च्या सुमारास हातात असलेले दगड भवनावर भिरकावून देत शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे राष्ट्रवादीच्या भवनाच्या दर्शनी भागात असलेल्या काचांचा खच समोर पडलेला होता. दगडफेक सुरू असतानाच काही आदिवासी युवकांनी शरद पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या घटनेनंतर आंदोलनकत्रे आदिवासी युवक घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती संपूर्ण शहरभर पसरताच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, महापौर प्रताप देशमुख, प्रमोद वाकोडकरसह राष्ट्रवादीचे कार्यकत्रे घटनास्थळी आले. सोबतच पोलीस अधीक्षक अनंत रोकडे हेही सहकाऱ्यांसह भवनात दाखल झाले. त्यांनी तोडफोडीची पाहणी करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कार्यकत्रे आणि बघ्यांची गर्दी जमू लागल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून घेतली. परिहार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. शनिवारी शरद पवार यांनी पुण्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्याचा निषेध म्हणून आदिवासी समाजातील युवकांनी हे कृत्य केल्याचे समजते. शहरातील उघडा महादेव मंदिर येथे घटनेच्या तासाभरापूर्वी आदिवासी समाजातील युवक मोठय़ा संख्येने जमा झाले होते. हातात लाकडी दंडुके, बॅट, दगड घेऊन जमा झालेले युवक राष्ट्रवादी भवनावर चालून आले, अशी माहिती समोर येत आहे. अवघ्या दहाच मिनिटांत ही घटना घडली. काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तर त्याच क्षणी पुतळाही जाळण्यात आला. या संपूर्ण घटनेचे हल्लेखोरापकी एकाने छायाचित्रणदेखील केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हल्लेखोरांनी यावेळी घटनास्थळावर एक पत्रकही टाकले आहे. त्यात पवारांबद्दल अपशब्द आढळून आले आहेत.  राष्ट्रवादी भवनासमोर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.