उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना आदेश

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत इकडचे तिकडे होता कामा नये अथवा ते बाद होऊ नये याची काळजी घ्या, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना दिले.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचबरोबर काँग्रेसतर्फे भाई जगताप, भाजपतर्फे मनोज कोटक, तर अपक्ष म्हणून प्रसाद लाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या पाश्र्वभूमीवर शनिवारी एमआयजी क्लबमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र पक्षादेश आल्यामुळे भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या बैठकीस भाजपचे नगरसेवक अनुपस्थित राहिले. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या सोहळ्यास उपस्थिस राहून उद्धव ठाकरे रात्री उशीरा या बैठकीस आले. शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांना मतदान करण्याचे आदेश देतानाच कोणतीही गडबड होऊ नये याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
दुसऱ्या पसंतीचे मत कोणाला द्यायचे की द्यायचेच नाही याबाबत नगरसेवकांना आयत्या वेळी कळविण्यात येईल, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.